Gram Panchayat Election Result: “९०० पेक्षा जास्त ग्रामपंचायतींवर काँग्रेसचा विजय; महाविकास आघाडीच पहिल्या नंबरवर!”
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2022 05:16 PM2022-12-20T17:16:01+5:302022-12-20T17:17:05+5:30
Gram Panchayat Election Result: ग्रामपंचायत निवडणुकीबाबतचे भाजपचे दावे खोटे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दत्तक घेतलेल्या फेटरी गावातही पराभव.
Gram Panchayat Election Result: राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्षाने ९०० पेक्षा जास्त ठिकाणी विजय मिळवला असून महाविकास आघाडीच राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. भारतीय जनता पक्षाचे विजयाचे दावे खोटारडे आहेत. भाजपा प्रदेशाध्यक्षाच्या जिल्ह्यातही भाजपाचा दारूण पराभव झाला असून गावखेड्यातील लोकांनी भारतीय जनता पक्ष व शिंदे गटाला सपशेल नाकारले आहे, हे या निकालातून स्पष्ट झाले आहे, अशी प्रतिक्रीया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिली आहे.
प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये काँग्रेस व मित्र पक्षाने दमदार कामगिरी केली असून गावातील लोकांनीही काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडीवर विश्वास व्यक्त करत विजयावर शिक्कामोर्तब केले आहे. भाजप व शिंदे गटाची गावात इज्जत राहिली नाही, लोकांमध्ये इज्जत राहिली नाही. महाविकास आघाडीच्या विजयाची धास्ती घेऊन भाजप व शिंदे गट विधानभवनच्या पायऱ्यांवर आंदोलनाचा थयथाट करत आहेत, असे नाना पटोले म्हणाले.
ग्रामीण भागात काँग्रेसची पाळेमुळे आजही घट्ट
ग्रामीण भागात काँग्रेसची पाळेमुळे आजही घट्ट आहेत, जनतेने काँग्रेस पक्षावर दाखवलेला विश्वास आम्ही सार्थ ठरवू. नागपूर जिल्ह्यात २३६ पैकी २०० ग्रामपंचायतींवर काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला असून भाजपला ३६ जागाही मिळाल्या नाहीत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या नागपूर जिल्ह्यातील फेटरी गावातही काँग्रेसचा विजय झाला आहे. भाजपा विजयाचे खोटे दावे असून दुस-याच्या घरी पोरगा झालातरी भाजपवाले लाडू वाटतात. विधानपरिषद निवडणुकापांसून भारतीय जनता पक्षाच्या पराभवाची मालिका सुरू झाली असून नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकीनंतर आता ग्रामपंचायतमध्येही पराभव केला आहे. आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीतही भाजपाला धूळ चारून काँग्रेसच्या विजयाचा गुलाल उधळू, असेही पटोले म्हणाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"