Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra In Maharashtra: देशाची अवस्था अत्यंत वाईट असून लोकशाही व संविधान संपवून जनतेला महागाई व बेरोजगारीच्या खाईत लोटले आहे. शेतकऱ्यांना उद्धवस्त करण्यात आले आहे. देशाला दिशा दाखवण्याचे काम महाराष्ट्राने केले आहे यावेळीही महाराष्ट्रच परिवर्तनाचा संदेश देणार आहे. भाजपा लोकसभेच्या १५० जागाही निवडून येणार नाहीत. भाजपाचा शेवटचा प्रयत्न सुरु आहे. केंद्रातील भाजपा सरकार खाली खेचण्याची भावना जनतेची झालेली आहे, या शब्दांत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निशाणा साधला.
पत्रकार परिषदेला संबोधित करताना काँग्रेस नेत्यांनी भारत जोडो न्याय यात्रेची माहिती दिली. काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आता महाराष्ट्रात येत आहे. १४ जानेवारी २०२४ ला मणिपूरमधून भारत जोडो न्याय यात्रा सुरु झाली. या यात्रेने ५९ व्या दिवशी महाराष्ट्रात प्रवेश केला आहे. १७ मार्च रोजी शिवाजी पार्कवरील सभेत इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत सभा होणार असल्याचे सांगितले जात आहे.
नंदूरबार जिल्हा नेहमीच काँग्रेस पक्षाच्या विचाराचा जिल्हा राहिला आहे. या जिल्ह्यातून काँग्रेसचे उमेदवार नेहमी निवडून आला आहे. भाजपाच्या कार्यपद्धती व विचाराविरुद्ध आहेत. जे या विरोधात आहे त्या सर्वांनी एकत्र यावे ही भूमिका काँग्रेसची आहे. या विचाराचे लोक भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होत आहेत. भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान १४ मार्चला चांदवड येथे शेतकरी मेळावा होत असून मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार. शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती बाळासाहेब थोरात यांनी दिली.
दरम्यान, महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची चर्चा सुरु आहे, सर्व समविचारी पक्षांनी एकत्र येऊन लढण्याचा निर्णय आहे. जागा वाटपासंदर्भात महाविकास आघाडीची चर्चा असून कोणतेही मतभेद नाहीत. वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा सुरु आहे व बाळासाहेब थोरात हेही त्यांच्याशी चर्चा करत आहेत. १७ तारखेनंतर मविआचा जागा वाटपाचा फार्म्युला जाहीर केला जाईल, असे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी म्हटले आहे.