Nana Patole: आगामी लोकसभा निवडणुकांसाठी विरोधकांनी हळूहळू कंबर कसायला सुरुवात केली आहे. भाजपविरोधी पक्षांची एकजूट व्हावी आणि विरोधक एकजुटीने लढावेत, यावर भर दिला जात आहे. यातच कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपला चितपट केल्यामुळे काँग्रेसमध्ये नवचैतन्य संचारले आहे. यातच आता पुन्हा एकदा राहुल गांधी पंतप्रधान होण्याबाबत विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबत विधान केले आहे. नाना पटोले यांनीही अशीच इच्छा बोलून दाखवली आहे. राहुल गांधी हे देशाला २०२४ मध्ये पंतप्रधान होतील, असा संदेश आम्ही प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून देत आहोत, असे नाना पटोले म्हणाले. आजच सरकार हे केवळ घोषणाबाजी करणारे सरकार आहे. घोषणाबाज पंतप्रधान पहिल्यांदा आपण पाहतोय. मात्र या पूर्वी काँग्रेस पंतप्रधान यांनी खूप काही दिले आहे, असे नाना पटोले यांनी सांगितले.
हे खऱ्या अर्थाने तुगलकी पंतप्रधान आहेत का? असे लोक बोलत आहेत
रिझर्व्ह बँकेने २ हजार रुपयांची नोट चलनातून मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला. यावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, दोन हजारची नोट बंद केली. हे खऱ्या अर्थाने तुगलकी पंतप्रधान आहेत का? असे लोक बोलत आहेत. या देशाची सत्ता बदलण्याचा लोकांचा मानस आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. शिंदे-फडणवीस सरकारवरही नाना पटोले यांनी निशाणा साधला. हे सरकर योजनाचा पाऊस पडत आहे. हे सरकार दारोदारी नाही, तर कुठेच राहत नाही. यांचे सामान्य लोकांकडे, शेतकऱ्यांकडे लक्ष नाही, अशी टीका नाना पटोलेंनी केली.
दरम्यान, महाविकास आघाडीत राष्ट्रवादीच मोठा भाऊ असल्याचे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले आहे. यावर नाना पटोले यांनी भाष्य केले. आम्ही मोठे होतो तेव्हा कधीच गर्व केला नाही त्यांनीही गर्व करू नये. आम्ही नेहमी मोठे होतो मात्र आम्ही कधीही त्याचा गर्व केला नाही. सर्वांना सोबत घेऊन चाललो, असे प्रत्युत्तर नाना पटोले यांनी दिले.