“आगामी विधानसभेत मविआला १८० जागांपुढे जाईल, BJPला १०० पार करता येणार नाहीत”: नाना पटोले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2024 04:08 PM2024-08-10T16:08:02+5:302024-08-10T16:09:23+5:30
Nana Patole News: महाराष्ट्रात आमचे सरकार आले तर कर्नाटकसारखी महालक्ष्मी योजना सुरु करु, अशी गॅरंटी नाना पटोले यांनी दिली.
Nana Patole News: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी आता हळूहळू तयारीचा वेग वाढवलेला पाहायला मिळत आहे. दौरे, भेटी-गाठी, बैठकांचे सत्र सुरू आहे. विधानसभेसाठीचे जागावाटप यावरून महाविकास आघाडी आणि महायुतीत खल सुरू असल्याचे दिसत आहे. यातच आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला १८० पेक्षा जास्त जागांवर विजय मिळेल, तर भाजपा आणि त्यांच्या सोबत असलेल्यांना १०० जागाही पार करता येणार नाहीत, असा मोठा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
भाजपा जनतेला गुलामीकडे नेण्याचे काम करत आहे. ही व्यवस्था मनुवादी आहे. विधानसभेची निवडणूक महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आहे. राज्याचा स्वाभिमानी या सरकारने गुजरातमध्ये नेण्याचे काम केले. भाजपाची व्यवस्था नकली आहे. पुढच्या निवडणुकीत लातूर, बीड आणि धाराशीव जिल्ह्यातील जनतेला सांगत आहे की, यांना उखडून फेका. राज्यात भाजपाचेच सरकार आहे. एकनाथ शिंदे हे केवळ मुखवटा आहे, या शब्दांत नाना पटोले यांनी हल्लाबोल केला.
आमचे सरकार आल्यास महालक्ष्मी योजना सुरु करु
महाराष्ट्रात आमचे सरकार आले तर कर्नाटकसारखी महालक्ष्मी योजना सुरु करु. दोन कोटी रोजगार देऊ, प्रत्येकाच्या खात्यावर १५ लाख टाकू, असे भाजपने सांगितले. पण यातील काही झाले नाही. अलीकडे फडणवीस सांगत आहेत की, यांना सगळ्यांना ठोकून काढा. पदावर बसलेला माणूस असे बोलत आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली.
दरम्यान, मराठवाडा हा काँग्रेसचा आहे. त्यामुळे ही गाडी नांदेडकडे घेऊन जाऊ. आता नांदेडची गाडी स्वच्छ ठेवू, असा टोला नाना पटोलेंनी अशोक चव्हाणांना लगावला.