“मोदी-शाहांच्या स्क्रिप्टनुसार राज्यात राजकीय फोडाफोडी, काँग्रेस भाजपचा खरा चेहरा उघड करेल”
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2023 09:16 AM2023-07-05T09:16:22+5:302023-07-05T09:17:02+5:30
Maharashtra Political Crisis: राजकीय परिस्थितीवर काँग्रेस लक्ष ठेवून असून, आमची वेट अँड वॉच ची भूमिका आहे, असे सांगण्यात आले आहे.
Maharashtra Political Crisis: भाजप जनतेचे मूळ विषयापासून दुसरीकडे लक्ष हटवण्यासाठी इतर मुद्द्यांना चर्चेत आणत असते. पण काँग्रेस पक्ष जनतेचे प्रश्न हाती घेऊन सरकारला जाब विचारेल व भाजपचा खरा चेहरा उघडा करेल. महाराष्ट्रात जे राजकीय नाट्य सुरु आहे ते मोदी-शहा दिल्लीतून जी स्क्रिप्ट लिहून देतात त्याप्रमाणे होत आहे. काही लोकांना ईडी सीबीआयची भिती दाखवली जात आहे. भाजपाचे नाही ऐकले तर जेलमध्ये जावे लागेल या भितीतून हे सर्व सुरु आहे. महाराष्ट्रात जे राजकारण सध्या सुरु आहे ते दुःखद आहे. भूषणावह नाही. शाहु, फुले, आंबडेकरांच्या महाराष्ट्रात अशा पद्धतीचे घाणेरडे राजकारण होत आहे हे जनतेला पटलेले नाही, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
काँग्रेसच्या एका बैठकीनंतर मीडियाशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर काँग्रेस लक्ष ठेवून आहे. आमची वेट अँड वॉच ची भूमिका आहे. विरोधी पक्ष नेतेपदाबाबत ज्या पक्षांची सदस्य संख्या जास्त त्याच पक्षाचा विरोधी पक्ष नेता होतो. खासदार शरद पवार यांनी यासंदर्भात भूमिका जाहीर केलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उद्या दोन स्वतंत्र बैठका होत आहेत, त्यानंतर उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्याशी चर्चा करुन पुढील रणनिती ठरविली जाईल, असे नाना पटोले यांनी सांगितले.
काँग्रेस पक्ष सरकारविरोधात जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवत राहील
विधिमंडळ काँग्रेस पक्षाच्या बैठकीत राज्यातील सद्य राजकीय परिस्थीतीवर चर्चा करण्यात आली, सर्वांनी मते मांडली. राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीत काँग्रेस पक्ष म्हणून पुढची रणनिती काय असावी यावरही चर्चा झाली. महानगरपालिका, नगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसंदर्भात एच. के. पाटील यांनी मार्गदर्शन केले. महाविकास आघाडी म्हणून भाजपाविरोधात लढण्यावर चर्चा झाली. काँग्रेस पक्ष आगामी पावसाळी अधिवेशनातही सरकारविरोधात जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवत राहील, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.