Congress Nana Patole News: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. बिहारमध्ये नितीश कुमार यांनी इंडिया आघाडीला रामराम करत एनडीएसोबत जात सत्तांतर घडले. यावरून नितीश कुमार आणि भाजपावर टीका करण्यात येत आहे. राज्यातील महाविकास आघाडीचे नेतेही निशाणा साधत आहेत. यातच आता आगामी निवडणुकीत भाजपामुक्त महाराष्ट्र करण्याचा प्रयत्न करणार असल्याचा निर्धार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.
प्रदेश काँग्रेसची मराठवाडा विभागातील जिल्हानिहाय आढावा बैठक लातूरमध्ये संपन्न झाली. यानंतर मीडियाशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, भाजपा सरकारविरोधात जनतेत प्रचंड आक्रोश आहे. भाजपा सरकार जिल्हा परिषद, नगरपरिषद, महापालिका निवडणुका घेत नाही. जाहिरातीच्या आधारावर स्वतःची पाठ थोपटून घेत आहे. शेतकरी प्रचंड संकटात आहे, महागाई, बेरोजगारी वाढली आहे पण सरकार त्याकडे लक्ष देत नाही, अशी टीका नाना पटोले यांनी केली.
जागावाटपाबाबत कोणतेही मतभेत नाहीत
महाराष्ट्रातील सर्व ४८ जागा महाविकास आघाडी मिळून लढणार आहे. जागावाटपाबाबत कोणतेही मतभेत नाहीत. सर्व घटक पक्षांना सोबत घेऊन ही निवडणूक लढवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. लोकशाही व संविधान वाचवण्याच्या या लढाईत जे पक्ष भाजपाविरोधात लढत आहेत त्या सर्वांना एकत्र आणण्याचा प्रयत्न आहे. मराठवाड्यातही लोकसभेच्या सर्वात जास्त जागा मविआच जिंकेल व राज्यातील लुटारू, भ्रष्टाचारी, जुलमी सरकारला घरी बसवून भाजपामुक्त महाराष्ट्र करण्याचा प्रयत्न करु, असे पटोले म्हणाले.
दरम्यान, आरक्षणाच्या नावाखाली फसवणूक केली जात आहे. मुंबईत सहा दिवसात २७ लाख लोकांचे सर्वेक्षण केले अशा बातम्या दिल्या जात आहेत. हे लोक बंद घरांचे सर्वेक्षण करत आहेत का? २०१४ साली मराठा व धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते परंतु अजून आरक्षण दिले नाही, अशी टीका नाना पटोलेंनी केली.