“मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा भाजप सरकारकडून सातत्याने प्रयत्न”; नाना पटोलेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2023 04:10 PM2023-05-04T16:10:05+5:302023-05-04T16:12:03+5:30

Maharashtra Politics: मुंबई गुजरातला नेता येत नाही म्हणून ती उद्ध्वस्त करण्याचा भाजपचा डाव आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली.

congress nana patole criticised bjp modi govt over mumbai importance | “मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा भाजप सरकारकडून सातत्याने प्रयत्न”; नाना पटोलेंची टीका

“मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा भाजप सरकारकडून सातत्याने प्रयत्न”; नाना पटोलेंची टीका

googlenewsNext

Maharashtra Politics: राज्यासमोरील प्रश्नांसदर्भात राज्यपाल रमेश बैस यांची काँग्रेस शिष्टमंळाने भेट घेऊन दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलवण्याचे निर्देश राज्य सरकारला द्यावेत अशी विनंती करण्यात आलेली आहे. राज्याच्या हितासाठी राज्यपाल काँग्रेसच्या मागणीचा सहानुभूतीने विचार करतील अशी अपेक्षा आहे. विशेष अधिवेशन बोलावले नाही तर काँग्रेस जनतेच्या प्रश्नांसाठी राज्यभर रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन करेल, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिला आहे.

प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, सरकार शेतकऱ्यांना मदत करत नाही, ही मदत तात्काळ मिळावी, बारसू रिफायनरी प्रकल्पासाठी स्थानिक लोकांवर पोलीस अत्याचार करत आहेत. खारघरमध्ये सरकारच्या ढिसाळ नियोजनाने १४ लोकांचे बळी गेले, त्याप्रकरणात अद्याप कारवाई केली जात नाही या व राज्यातील इतर महत्वाच्या प्रश्नावर चर्चा होणे गरजेचे आहे म्हणून दोन दिवसांचे विशेष अधिवेशन घेण्याची मागणी केलेली आहे, असे नाना पटोले यांनी स्पष्ट केले. 

मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा भाजपा सरकारकडून प्रयत्न

मुंबई, महाराष्ट्राचे महत्व कमी करण्याचा डाव भाजपचे दिल्लीतील सरकार सातत्याने करत आहे. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे, जगात मुंबई शहराला महत्त्वाचे स्थान आहे, सर्व महत्त्वाच्या आर्थिक संस्था, विविध कंपन्यांची मुख्यालये मुंबईत आहेत, मुंबईचे हे महत्त्व भाजपच्या डोळ्यात खुपत आहे. मुंबईतील महत्त्वाची कार्यालये गुजरातला हलवून मुंबईचे महत्त्व कमी करण्याचे प्रयत्न सातत्याने केले जात आहेत. बुलेट ट्रेनची गरज नसताना ती मुंबई व महाराष्ट्रावर लादली जात आहे. मुंबईतील ‘बीकेसी’मध्ये होणारे आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र गांधीनगरला हलवण्यात आले. पेटंट, डिझाईन आणि ट्रेडमार्कचे ऑफिस दिल्लीला हलवले, नॅशनल मरीन पोलीस अकादमी पालघरहून गुजरातमधल्या द्वारकाला हलवण्यात आली. मुंबईमध्ये हिऱ्यांचा मोठा उद्योग पंचरत्न बिल्डिंगमध्ये होता यातील एक मोठा गट गुजरातला गेला. मुंबई व राज्यातील महत्वाची कार्यालये व प्रकल्प दिल्लीच्या इशाऱ्यावर राज्याबाहेर स्थलांतरीत करण्यात आली. मुंबई गुजरातला नेता येत नाही म्हणून ती उद्ध्वस्त करण्याचा भाजपचा डाव आहे, अशी घणाघाती टीका नाना पटोले यांनी केली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: congress nana patole criticised bjp modi govt over mumbai importance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.