“शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या भाजपकडून शेतकऱ्यांना काहीही अपेक्षा नाहीत”; काँग्रेसची चपराक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2023 04:00 PM2023-08-22T16:00:08+5:302023-08-22T16:01:34+5:30
Maharashtra Politics: शेतकरी पेटून उठला तर, भाजपची सत्तेची मस्ती उतरल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका करण्यात आली आहे.
Maharashtra Politics: केंद्र सरकारने कांदा निर्यात शुल्क ४० टक्के वाढविल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी संताप व्यक्त करत आहेत. याविरोधात शेतकरी आणि संघटना केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करत असताना राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिल्ली गाठली आणि केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्याशी चर्चा केली. यानंतर केंद्र सरकारने २ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून, २४१० रुपये प्रति क्विंटल दराने ही खरेदी करण्यात येणार आहे. मात्र, कांद्याच्या मुद्द्यावरून काँग्रेसचे केंद्र सरकारवर टीका केली आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मीडियाशी बोलताना कांद्याच्या प्रश्नावर भाजप सरकारवर चांगलीच तोफ डागली. कांदा नाशवंत आहे, तो खराब झाला तर त्याची भरपाई सरकार देणार आहे का? शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती कमजोर करण्याचे काम भाजपा सरकार करत आहे. भाजप सरकारने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केलेले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना आतंकवादी, नक्षलवादी, आंदोलजीवी, खलिस्तानी म्हणून त्यांचा अपमान केला हे शेतकरी विसरलेले नाहीत. शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या भाजपा व नरेंद्र मोदींकडून शेतकऱ्यांना काहीही अपेक्षा नाहीत. शेतकरी पेटून उठला तर भाजपाचा सत्तेचा माज उतरवल्याशिवाय राहणार नाही, या शब्दांत नाना पटोले यांनी हल्लाबोल केला.
शिंदे सरकारमधील मंत्र्यांना ना शेतकऱ्यांची चिंता आहे ना जनतेची
मागील वेळीही कांद्याचे दर पडल्यानंतर नाफेडमार्फत कांदा खरेदी करण्याचे राज्य सरकारने जाहीर केले होते पण प्रत्यक्षात नाफेडने कांदा खरेदी केला नाही तसेच तूर, चणा व कापूसही नाफेडने खरेदी केला नाही. कांद्याचा दरावरून राज्यभर तीव्र संताप व्यक्त केला जात असताना राज्यातील मंत्री मात्र लोकांच्या भावनांशी खेळत आहेत. कांदा परवडत नसेल तर महिना-दोन महिने कांदा खाल्ला नाही तर काय बिघडतं? असा उद्धट सवाल शिंदे सरकारमधील मंत्री दादा भुसे यांनी केला आहे. शिंदे सरकारमधील मंत्र्यांना ना शेतकऱ्यांची चिंता आहे ना जनतेची, हे सत्तेच्या मस्तीत आहेत पण जनता त्यांना योग्य वेळी धडा शिकवेल, अशी टीका नाना पटोले यांनी केली.
दरम्यान, कांद्यावरील निर्यात शुल्क ४० टक्के करून कांद्याचे भाव घसरल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शेतकऱ्यांचा संताप पाहून घाबरलेल्या राज्य सरकारने केंद्र सरकारकडे धाव घेऊन नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी करणार असल्याचे सांगत आहेत. नाफेडमार्फत कांदा खरेदी ही शेतकऱ्यांची दिशाभूल आहे. केंद्र सरकारने वाढवलेले ४० टक्के निर्यात शुल्क कमी का करत नाहीत? याचे उत्तर जनतेला द्या, अशी मागणी नाना पटोले यांनी केली.