“४ हजार कोटींच्या ड्रग्जचे गुजरात कनेक्शन आहे का?”; काँग्रेसचा सवाल, महायुतीवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2024 07:35 PM2024-02-21T19:35:03+5:302024-02-21T19:36:55+5:30

Congress Nana Patole News: महायुती सरकार राज्यातील तरुणांना धर्माची अफू व ड्रग्जचे विष देऊन बरबाद करण्याचे काम करत आहे, अशी टीका करण्यात आली आहे.

congress nana patole criticize state mahayuti govt over pune police action on drugs | “४ हजार कोटींच्या ड्रग्जचे गुजरात कनेक्शन आहे का?”; काँग्रेसचा सवाल, महायुतीवर टीका

“४ हजार कोटींच्या ड्रग्जचे गुजरात कनेक्शन आहे का?”; काँग्रेसचा सवाल, महायुतीवर टीका

Congress Nana Patole News: पुण्यात तीन दिवसात तब्बल ४ हजार कोटी रुपयांचे अंमली पदार्थ सापडणे अत्यंत गंभीर व चिंताजनक आहे. गुजरातमधील मुंद्रा बंदरातून हजारो टन ड्रग्जचा धंदा होत असल्याचे वारंवार उघड झाले आहे. मुंद्रा बंदराचा मालक व भाजपाचे काय संबंध आहेत, हे जगजाहीर आहे. महायुती सरकार राज्यातील तरुणांना धर्माची अफू व ड्रग्जचे विष देऊन बरबाद करण्याचे काम करत आहे, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, राज्यात अंमलीपदार्थांचा काळा धंदा जोरात सुरु आहे. याआधी नाशिक, छत्रपती संभाजी नगर, अमरावती, सोलापूर या ठिकाणीही अंमली पदार्थांचे मोठे साठे सापडले होते. पोलिसांनी थातूर मातूर कारवाई केली, ड्रग माफिया मात्र मोकाटच राहिले म्हणूनच पुण्यात ४ हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज सापडलेत. राज्यात कायदा सुव्यवस्थेचे तर धिंडवडेच निघाले आहेत. विधानसभेत राज्याचा एक वरिष्ठ मंत्रीच त्यांना धमक्या येत असल्याचे सांगतात यावरून कायदा सुव्यवस्थेची काय परिस्थिती आहे हे लक्षात येते. हे सरकार भ्रष्ट असून फक्त तिजोरी लुटण्यात व्यस्त आहे, या शब्दांत नाना पटोले यांनी हल्लाबोल केला.

सरकारच्या नाकर्तेपणामुळे पुण्याला ड्रग्जचा विळखा पडला

पुणे पोलिसांच्या इतिहासातील सगळ्यात मोठी कारवाई मागील दोन दिवसांत झाली आहे. विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात हजारो कोटींचे ड्रग्ज सापडले. सरकारच्या नाकर्तेपणामुळे पुण्याला ड्रग्जचा विळखा पडला आहे. महायुती सरकारच्या काळात ड्रग माफियांचा सुळसुळाट वाढला असून सरकारची डोळेझाक कशासाठी; ड्रग माफियांना कुणाचा आशीर्वाद आहे, असा संतप्त सवाल विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. 

दरम्यान, राज्यातील तरुणाईला वाचविण्यासाठी ड्रग माफियांचा सरकारने वेळीच बंदोबस्त केला पाहिजे. सरकारने धडक कारवाई करून जरब बसविली पाहिजे. अन्यथा हे ड्रग माफिया तरुणाईला देशोधडीला लावतील. सरकारने याकडे डोळेझाक करू नये. ज्यांच्या आशीर्वादाने ड्रग रॅकेट सुरु आहे त्यांच्या देखील मुस्क्या सरकारने आवळल्या पाहिजेत. सरकारने ड्रग प्रकरण गांभीर्याने घेऊन दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली.
 

Web Title: congress nana patole criticize state mahayuti govt over pune police action on drugs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.