“देशातील भाजपचे हुकुमशाही सरकार उलथवणे हेच काँग्रेसचे उदिष्ट”; नाना पटोलेंचा एल्गार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2023 03:19 PM2023-10-09T15:19:59+5:302023-10-09T15:23:45+5:30

Maharashtra Politics: मध्य प्रदेशसह पाचही विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष व इंडिया आघाडीचेच सरकार सत्तेत येणार हे सूर्यप्रकाशाएवढे स्वच्छ आहे, असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला.

congress nana patole criticized bjp about various issues | “देशातील भाजपचे हुकुमशाही सरकार उलथवणे हेच काँग्रेसचे उदिष्ट”; नाना पटोलेंचा एल्गार

“देशातील भाजपचे हुकुमशाही सरकार उलथवणे हेच काँग्रेसचे उदिष्ट”; नाना पटोलेंचा एल्गार

googlenewsNext

Maharashtra Politics: इंग्रजांनी देशाला लुटले त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्ष आज देशाला लुटत आहे. भाजपा सरकारने रेल्वे विकली, विमानतळे विकली, वीज वितरण व्यवस्था विकली तसेच अनेक सार्वजनिक उपक्रमही विकले. देशाची संपत्ती विकून मोदी सरकार कारभार करत आहे. लोकशाही व्यवस्था, संविधान व न्याय व्यवस्थेलाही संपवण्याचा प्रयत्न सुरु असून देशाला लुटणाऱ्या जगातील बलाढ्य इंग्रज सत्तेला जसे देशातून हाकलून लावले तसेच संविधान, लोकशाही संपवणारे देशातील भाजपाचे लुटारू हुकुमशाही सरकार हाकलून लावणे हेच काँग्रेस पक्षाचे उदिष्ट आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले आहे.

उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदूरबार जिल्ह्यांची आढावा बैठक नाशिक मध्ये घेण्यात आली, त्यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले प्रसारमाध्यमांशी बोलत होते. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या उदयपूर शिबिराची अंमलबजावणी करणे तसेच पक्ष संघटना जिल्हा, ब्लॉक, मंडल स्तरापर्यंत मजबूत करुन विधानसभा, लोकसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाला घवघवीत यश मिळावे यासाठी प्रयत्न सुरु आहेत. देशातील वातावरण बदललेले असून राहुल गांधींच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास वाढलेला आहे, काँग्रेस पक्ष व इंडिया आघाडीच देशाला तारु शकते हा जनतेला विश्वास आहे. राजस्थान, छत्तिसगड, तेलंगणा, मध्य प्रदेशसह पाचही विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष व इंडिया आघाडीचेच सरकार सत्तेत येणार हे सूर्यप्रकाशाएवढे स्वच्छ आहे.

तरुणांना वाचवण्यासाठी ‘नाशिक बचाव’ आंदोलन

नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर ड्रग सापडल्याचा प्रकार अत्यंत गंभीर असून शाळा, कॉलेजमधील विद्यार्थ्यांना ड्रग्जच्या विळख्यात अडकवून त्यांच्या जीवनाशी खेळण्याचे पाप आहे. काँग्रेस पक्ष या माफियांच्या व ड्रग माफियांना मदत करणाऱ्यांच्याविरोधात आहे. ड्रगच्या धंद्यातील कोणालाही माफ करु नये हीच काँग्रेस पक्षाची भूमिका असून ड्रग्जच्या विषापासून तरुणांना वाचवण्यासाठी ‘नाशिक बचाव’ आंदोलन केले जाणार असल्याची माहितीही नाना पटोले यांनी दिली.

दरम्यान, भारतीय जनता पक्ष सत्तेचा दुरुपयोग करत आहे. ब्रिटिश राजवटीप्रमाणे जे लोक सरकारविरोधात बोलतात त्यांच्यावर कारवाई केली जाते. विरोधकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा भाजप सरकारचा प्रयत्न आहे. पंतप्रधान ज्यांच्यावर ७० हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप लावतात त्यांनाच दोन दिवसात सत्तेत सहभागी करुन घेतात ही भाजपची दुटप्पी भूमिका आहे, अशी टीका करण्यात आली. या आढावा बैठकीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, प्रदेश कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे, आमदार कुणाल पाटील, प्रदेश सरचिटणीस डॉ. राजू वाघमारे यांच्यासह अन्य नेते, कार्यकर्ते उपस्थित होते.
 

Web Title: congress nana patole criticized bjp about various issues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.