Nana Patole: विधानसभा व लोकसभेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या विस्तारीत कार्यकारिणीच्या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढताना मेरिटनुसारच जागा वाटप करण्यावर भर दिला जाणार आहे.प्रत्येक जागेचा सखोल अभ्यास करुन जागा वाटपावर चर्चा केली जाईल. भारतीय जनता पक्षाचा पराभव करणे हाच काँग्रेसचा निर्धार असून तोच उद्देश डोळ्यासमोर ठेवून जागा वाटप निश्चित केले जाईल,असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले. तसेच भाजपाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा अधिकार नाही. उलट राहुल गांधी हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार पुढे घेऊन जात आहेत, असे नाना पटोले म्हणाले.
भारतीय जनता पक्षाच्या मनमानी, अत्याचारी सरकारला खाली खेचणे हाच महाविकास आघाडीचा निर्धार आहे.जागा वाटपावरून मविआमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. २०१४, २०१९ व आत्ताची परिस्थिती वेगळी आहे. २ व ३ तारखेला काँग्रेस पक्ष प्रत्येक जागेचा आढावा घेऊन त्याबाबतचा निर्णय घेईल. महाराष्ट्र काँग्रेस विचाराचे राज्य आहे, विदर्भातही काँग्रेसचा जनाधार वाढलेला आहे. मागील तीन वर्षात आम्ही सर्व निवडणुकांमध्ये भाजपाला मागे टाकत विजय मोठा संपादन केला आहे. भाजपाला सत्तेतून खाली खेचण्यासाठी सर्व बाजूंचा विचार करुन जागा वाटप होईल, असे नाना पटोले यांनी सांगितले. ते मीडियाशी बोलत होते.
महापुरुषांचा अपमान होत असताना भाजपची तोंडे बंद का होती?
भाजपने सातत्याने महापुरुषांचा अपमान केला. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, यांच्याबद्दल भाजप मंत्र्यांनी केलेली विधाने जनता विसरलेली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेली अवमानजनक वक्तव्ये भाजपला मान्य आहेत का? महापुरुषांचा अपमान करत असताना भाजपाची तोंडे बंद का होती? भाजपाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा अधिकार नाही. उलट राहुल गांधी हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार पुढे घेऊन जात आहेत, त्यावर भाजपाने नाहक आरोप करणे बंद करावे. महापुरुषांचा अपमान करणाऱ्या भाजप नेत्यांनी जनतेची माफी मागितलेली नाही, या शब्दांत नाना पटोले यांनी हल्लाबोल केला.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते छत्रपतींच्या स्मारकाचे उद्घाटन केले त्याचे काय झाले? याचे उत्तर आधी द्या. भाजपला महापुरुषांच्या विचारांशी काहीही देणेघेणे नाही. भाजप फक्त मतांसाठी वापर करते. भाजपने त्यांचे थोतांड बंद करावे. भाजपचे हिंदुत्व नकली आहे. गोव्यात गोमातेबद्दल काय भूमिका आहे. महाराष्ट्रात काय भूमिका आहे, हे सर्वांना माहिती आहे. स्वतःच्या सोईने हिंदुत्वाचा वापर करणाऱ्या भाजपची खरा चेहरा जनतेला माहिती आहे. त्यावर त्यांनी आम्हाला शिकवू नये, असे नाना पटोले यांनी सुनावले.