“१ रुपयात पीक विमा देऊन सरकार शेतकऱ्यांवर उपकार करते काय?”; नाना पटोलेंची महायुतीवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 17:00 IST2025-02-15T16:58:45+5:302025-02-15T17:00:26+5:30

Congress Nana Patole News: कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंना सत्तेचा माज आला असून, शेतकऱ्यांना भिकारी म्हणणारे भाजपा महायुतीचे सरकारच भिकारी असल्याची टीका नाना पटोलेंनी केली.

congress nana patole criticized bjp mahayuti govt over agriculture minister manikrao kokate statement on farmers | “१ रुपयात पीक विमा देऊन सरकार शेतकऱ्यांवर उपकार करते काय?”; नाना पटोलेंची महायुतीवर टीका

“१ रुपयात पीक विमा देऊन सरकार शेतकऱ्यांवर उपकार करते काय?”; नाना पटोलेंची महायुतीवर टीका

Congress Nana Patole News: भाजपा महायुतीचे सरकार हे शेतकरी विरोधी आहे, हे वारंवार उघड झाले आहे. शेतकऱ्याला अतिरेकी, नक्षलवादी, आंदोलनजीवी म्हणून त्यांचा अपमान केला आणि आता राज्यातील कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना भिकारी म्हणून अकलेचे तारे तोडले आहेत. माणिकराव कोकाटे यांचे शेतकऱ्यांबद्दलचे विधान सत्तेचा माज आल्याचे दर्शवते. शेतकरी भिकारी नाही तर शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनतेला जीएसटीच्या माध्यमातून लुटणारे भाजपा महायुतीचे सरकारच भिकारी आहे, असा हल्लाबोल काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला आहे.

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विधानाचा समाचार घेत नाना पटोले म्हणाले की, शेतकरी जगाचा पोशिंदा आहे त्याचा अपमान करणे ही विकृती आहे. भाजपा महायुती सरकार हे शेतकरी विरोध असून फक्त धनदांडग्यांसाठी काम करत आहे. सरकार १ रुपयात पीक विमा देते म्हणजे शेतकऱ्यांवर उपकार करत नाही आणि हे पैसे माणिकराव कोकाटे त्यांच्या खिशातून देत नाहीत, अशी टीका नाना पटोले यांनी केली. 

शेतीसाठी लागणाऱ्या कृषी साहित्यावर १८ टक्के जीएसटी 

सरकार शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव देत नाही. कर्जमाफी देत नाही. निवडणुकीच्या काळात शेतकऱ्यांना भरमसाठ आश्वासने देऊन भाजपा महायुतीने मतांची भीक मागितली. शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या कृषी साहित्यावर १८ टक्के जीएसटी लावून सरकार शेतकऱ्यांकडूनच भीक घेते आणि वरून शेतकऱ्यांनाच भिकारी म्हणते, या शब्दांत नाना पटोले यांनी निशाणा साधला.

दरम्यान, शेतकऱ्यांच्या नावावर विविध योजनांमध्ये कृषी मंत्रालय कशी मलई खाते याचा पर्दापाश नुकताच आम्ही केला. पीक विमा योजनेतही भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले आहे. शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांची जाहीर माफी मागावी तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृषीमंत्र्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी नाना पटोले यांनी केली.

 

Web Title: congress nana patole criticized bjp mahayuti govt over agriculture minister manikrao kokate statement on farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.