“विधानसभेत खोटी माहिती, मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार”; परभणी प्रकरणी काँग्रेस आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 16:29 IST2025-02-10T16:28:53+5:302025-02-10T16:29:30+5:30
Congress Nana Patole News: बीड आणि परभणी या दोन्ही प्रकरणात सरकार चालढकल करत आहे, अशी टीका करण्यात आली आहे.

“विधानसभेत खोटी माहिती, मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार”; परभणी प्रकरणी काँग्रेस आक्रमक
Congress Nana Patole News: सोमनाथ सुर्यवंशी या निरपराध सुशिक्षित तरुणाचा मृत्यू पोलीस मारहाणीमुळेच झाल्याची पुष्टी शवविच्छेदन अहवालाने केली असताना राज्य सरकार अद्याप संबंधित पोलिसांना पाठीशी घालत आहे. सुर्यवंशी यांचा मृत्यू दम्याच्या आजाराने झाला, अशी खोटी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागपूर अधिवेशनात देऊन सभागृहाची दिशाभूल केली. आता सरकार याच प्रकरणी पोलिसांवर निलंबनाची कारवाई करत आहे. सुर्यवंशी यांच्या मृत्यूला पोलीस जबाबदार नाहीत तर मग सरकार त्यांना निलंबित का करत आहे असा प्रश्न विचारून फक्त निलंबित करून चालणार नाही तर त्यांना बडतर्फ केले पाहिजे. विधानसभेत खोटी माहिती देणाऱ्या मुख्यमंत्र्यांविरोधात काँग्रेस हक्कभंग आणणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.
नवी दिल्लीत काँग्रेस खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर मीडियाशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, परभणी व बीड प्रकरणी पोलिसांच्या मदतीने लोकांचे जीव घेतले गेले. परभणीतील आंबेडकरी अनुयायी सोमनाथ सुर्यवंशी यांची हत्या पोलिसांच्या मारहणीमुळेच झाल्याचे स्पष्ट झालेले आहे. सरकारने अजून त्या पोलिसांवर कठोर कारवाई केलेली नाही. संविधानाच्या विटंबनेनंतर परभणीत कोंबिंग ऑपरेशन करून निरपराध लोकांना बेदम मारहाण करण्यात आली. या कोंबिंग ऑपरेशनचे आदेश कोणी दिले? मंत्रालय व पोलीस महासंचालक कार्यालयातून आदेश दिले गेले का? याची चौकशी करून कोंबिंग ॲापरेशन करणारे अधिकारी व त्यांना आदेश देणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नाना पटोले यांनी केली.
मूळ प्रश्नापासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न
बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या व परभणीतील सोमनाथ सुर्यवंशी यांची हत्या या अत्यंत गंभीर घटना आहेत. दोन्ही प्रकरणात सरकार चालढकल करत आहे. बीड प्रकरणात भाजपाचे आमदार सुरेश धस दररोज नवीन सनसनाटी आरोप करत आहेत. पण सरकार काहीच कारवाई करत नाही. यावरून हे सर्व ठरवून सुरु आहे असे दिसते. आता त्यांनी परभणी प्रकरणात पोलिसांना माफ करण्याची भाषा केली आहे. हा दुटप्पीपणा असून तो फक्त सुरेश धस यांचा नसून सरकारचा दुटप्पीपणा आहे. सरकार सुरेश धसांना बुजगावण्यासारखे उभे करून मूळ प्रश्नापासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहे, असे नाना पटोले म्हणाले.
दरम्यान, महायुती सरकारच्या काळात कृषी विभागाने भ्रष्टाचाराचे विक्रम केले आहेत. शेतकऱ्यांच्या नावावर कृषी विभागाने कोट्यवधी रुपयांचा निधी परस्पर गायब केला. कापूस खरेदी पिशव्या असो वा नॅनो युरिया खरेदी असो, शेतकऱ्यांच्या योजना केवळ कागदावर राहिल्या. शेतकऱ्यांच्या योजनांसाठी डीबीटी पद्धतीचा वापर केला जात असताना त्याला बगल देऊन कृषी विभागाने घोटाळे केले. कृषी विभागातील भ्रष्टाचाराला फक्त कृषी विभागातील अधिकारी व कृषी मंत्रीच जबाबदार नाहीत तर तत्कालीन मुख्यमंत्री व राज्य सरकारही तितकेच जबाबदार आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.