“मराठा-ओबीसी वाद निर्माण करुन भाजपला महाराष्ट्राचे मणिपूर करायचे”; काँग्रेसचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2023 12:55 PM2023-09-08T12:55:41+5:302023-09-08T12:57:23+5:30
Maratha Reservation: आम्ही सत्तेत आल्यास आरक्षणाची ५० टक्के मर्यादा वाढवू. कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देऊ, असा दावा नाना पटोलेंनी केला आहे.
Maratha Reservation: जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या मनोज जरांगे यांच्या उपोषणानंतर राज्य सरकारने मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी दाखले देण्याबाबत शासन निर्णय जारी केला. जरांगे यांना उपोषण मागे घेण्याची लेखी विनंती करण्यात आली आहे. मात्र, सरसकट सर्वांना असा उल्लेख नसल्याने मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेण्यास नकार दिला आहे. यातच ओबीसी आरक्षणातून मराठा आरक्षण देण्याबाबत तर्क-वितर्क सुरू आहेत. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गंभीर आरोप केला आहे.
सन २०१४ च्या निवडणुकीत भाजपने मराठा समाजाला आरक्षण देण्याचे वचन दिले होते. ते त्यांना पाळता आले नाही. मात्र, आम्ही केंद्रात आणि राज्यात सत्तेत आल्यास आरक्षणाची ५० टक्के मर्यादा वाढवू आणि कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देऊ, असा दावा नाना पटोले यांनी केला आहे.
भाजपला महाराष्ट्राचे मणिपूर करायचे आहे
भाजपला जातनिहाय गणना करून मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यायचे नाही. ओबीसी समाजाच्या आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण देण्याची भाषा केली जात आहे. ओबीसींना मराठ्यांविरुद्ध भडकवण्याचा भाजपाचा हा प्रकार आहे. मराठा विरुद्ध ओबीसी वाद निर्माण करून भाजपला महाराष्ट्राचे मणिपूर करायचे आहे, असा गंभीर आरोप करताना दोन्ही समाजातील जनतेने संयम बाळगावा, असे आवाहन नाना पटोले यांनी केले. तसेच वास्तविक मराठा समाजाला आरक्षण देण्याकरिता जातनिहाय गणनेशिवाय पर्याय नाही. परंतु, भाजप त्याविरोधात आहे, अशी टीका नाना पटोलेंनी केली.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत आल्यास मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याचे आश्वासन दिले. भाजपची २०१४ मध्ये केंद्रात आणि राज्यात सत्ता आली, पण आरक्षण काही दिले नाही. उलट त्यांनी तत्कालीन महाधिवक्ता कुंभकोणी यांना मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही, अशाप्रकारचा युक्तिवाद करण्याची सूचना केली. फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षणाचे खोटे आश्वासन देऊन २०१४ मध्ये खड्डे खोदले. आता ते त्याच खड्ड्यात पुरले जाणार आहेत, या शब्दांत पटोले यांनी हल्लाबोल केला.