“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2024 05:57 PM2024-09-23T17:57:04+5:302024-09-23T17:57:25+5:30

Congress Nana Patole: निवडणुका आल्या म्हणून मोदींना शेतकऱ्यांची आठवण आली, अशी टीका नाना पटोले यांनी केली.

congress nana patole criticized central govt over farmers issues and msp | “शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले

“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले

Congress Nana Patole: भाजपा शेतकरी विरोधी आहे. राज्याच्या ७६ टक्के भागात दुष्काळ आहे, अतिवृष्टीने प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना मदत दिली पाहिजे पण भाजपा सरकारने तेलंगणाला ४ हजार कोटी रुपयांचे पॅकेज दिले परंतु महाराष्ट्राला मात्र फुटकी कवडीही दिली नाही. केंद्र व राज्यातील भाजपा सरकार जाणिवपूर्वक शेतकऱ्यांवर अन्याय करत आहे. भाजपा महायुती सरकार सर्व आघाड्यांवर फेल आहे पण भ्रष्टाचारात मात्र अग्रेसर आहे, अशी टीका काँग्रेसचे महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. 

प्रदेश काँग्रेसची विभागीय आढावा बैठक झाली. यावेळी काँग्रेसचे अनेक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस नेत्यांनी सरकारवर हल्लाबोल केला. भाजपा सरकार शेतकरी विरोधी असून सोयाबीन, कापूस, ऊस, कांदा, धान उत्पादक शेतकरी अनेक समस्यांचा सामना करत आहे. शेतमालाला भाव मिळत नाही, निर्यात करु शकत नाही. सरकार काहीच पावले उचलत नाही. समस्यांच्या गर्तेत सापडलेला शेतकरी आत्महत्या करत आहे. महाराष्ट्रात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या होत आहेत. महागाई व बेरोजगारीने जनता त्रस्त आहे. पण भाजपा सरकारला याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. टेंडर काढणे, भ्रष्टाचार आणि पैसा वसुली एवढेच सरकारचे काम सुरु आहे, अशी टीका प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केली. 

शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांचा उद्ध्वस्त करण्याचे धोरण

पंतप्रधान झालो तर पहिली सही शेतकरी कर्जमाफीच्या फाईलवर करेन, डॉ. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करेन, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करेन, असे नरेंद्र नरेंद्र मोदी यांनी २०१४ साली सांगितले होते. शेतकऱ्यांच्या आशीर्वादाने नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले पण त्यानंतर मात्र मोदींनी, हे तर चुनावी जुमले होते, असे म्हणत पलटी मारली. शेतकऱ्यांविरोधात तीन काळे कायदे आणून शेतकऱ्यालाच उद्ध्वस्त करायचे धोरण मोदी व भाजपाने आणले होते, अशी टीका नाना पटोले यांनी केली. 

दरम्यान, शेतकऱ्यांना आंदोलनजीवी, खलिस्तानी, नक्षलवादी, अतिरेकी म्हणून त्यांचा अपमान केला. आता निवडणुका आल्या म्हणून मोदींना शेतकऱ्यांची आठवण आली. वर्ध्याच्या सभेत मोदी म्हणाले की, शेतकरीच पोशिंदा आहे, शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे, सोयाबिनला १० हजाराचा भाव देऊ असे सांगितले. विरोधी पक्षात असताना भाजपाने सोयाबिनला ६ हजार रुपये भाव मिळावा म्हणून मोर्चा काढला होता आणि सत्तेत आहेत तर ४ हजार रुपये भाव देत आहेत. खतांचे भाव वाढले, डिझेलचा भाव वाढला, बी-बियाणांचा भाव वाढला पण शेतमालाचा भाव काही वाढला नाही, असे नाना पटोले म्हणाले.
 

Web Title: congress nana patole criticized central govt over farmers issues and msp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.