“लाच देऊन कंत्राटे मिळवल्याचे स्पष्ट, भ्रष्ट गौतम अदानींना अटक का करत नाही?”: नाना पटोले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2024 04:42 PM2024-11-21T16:42:59+5:302024-11-21T16:43:42+5:30
Congress Nana Patole Reaction On Adani Group Allegations In America: अमेरिका गौतम अदानींच्या भ्रष्टाचाराबद्दल अटक वॉरंट काढू शकते तर भारत सरकार कारवाई का करू शकत नाही, अशी विचारणा नाना पटोले यांनी केली आहे.
Congress Nana Patole Reaction On Adani Group Allegations In America: गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेच्या न्यायालयात अब्जावधी डॉलर्सची कथित लाच आणि फसवणुकीप्रकरणी आरोप करण्यात आले आहेत. न्यूयॉर्कच्या फेडरल कोर्टात गौतम अदानी यांच्यासह सात जणांवर अब्जावधी डॉलर्सची फसवणूक आणि लाचखोरीचा आरोप ठेवण्यात आला होता. सोलार एनर्जीचे कंत्राट मिळवण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांना २५० मिलियन डॉलर्स देण्याचे आश्वासन देण्यात आल्याचे यात सांगण्यात आले होते. या प्रकरणात गौतम अदानी आणि त्यांच्या काही नातेवाईकांसह आठ जणांची नावे आहेत. गौतम अदानी, सागर अदानी, विनीत एस जैन यांनी अमेरिकन, परदेशी गुंतवणूकदार आणि बँकांशी खोटे बोलून ही लाचेची रक्कम उभी केल्याचा आरोप आहे. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी यावरून टीका करत भारत सरकार गौतम अदानी यांच्यावर कारवाई का करत नाही, अशी विचारणा केली आहे.
उद्योगपती गौतम अदानी यांनी कंत्राटे मिळवण्यासाठी २ हजार कोटी रुपयांची लाच दिल्याच्या आरोपावरून अमेरिकेच्या कोर्टाने अटक वॉरंट काढले आहे. ही केंद्रातील सरकारसाठी लाजिरवाणी घटना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मदतीने गौतम अदानींनी देश विदेशात मोठ्या प्रमाणात कंत्राटे मिळवून देशाला लुटले आहे. भ्रष्टाचाराचे आरोप करून कोणतीही चौकशी न करता मोदी सरकारने मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये टाकले पण अमेरिकेच्या तपास यंत्रणाच्या तपासात अदानीने मोठ्या प्रमाणात लाच देऊन कंत्राटे मिळवल्याचे स्पष्ट झाल्यानंतरही भ्रष्ट अदानीला अटक का केली जात नाही? भारत सरकारने चौकशी करून गौतम अदानीला जेलमध्ये टाकावे ही लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची मागणी रास्तच आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.
देशाला लुटणाऱ्यांना जेलमध्ये टाकले पाहिजे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहकार्याने व सरकारी यंत्रणांच्या मदतीने अदानी देशाला लुटत आहे. विमानतळ, बंदरे, उर्जानिर्मितीसह सर्वच क्षेत्रात अदानीची मक्तेदारी सुरु असून त्याला जबाबदार पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच आहेत. अदानीला देश विदेशातील कंत्राटे देण्यासाठी पंतप्रधान मोदीच मदत करत आहेत हे उघड आहे. धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या नावाखाली स्थानिकांना बेघर करण्याचा डाव आखून लाखो कोटी रुपयांची मुंबईतील जमीन अदानीच्या घशात घातलेली आहे. मुंबईचे विमानतळही अदानीच दिले आहे. यापाठीमागे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भक्कम पाठिंबा आहे. विरोधी पक्षनेते या नात्याने राहुल गांधी यांनी अदानीवर कारवाई करण्याची केलेली मागणी रास्तच असून अमेरिका जर गौतम अदानीच्या भ्रष्टाचाराबद्दल अटक वॉरंट काढू शकते तर भारत सरकार का कारवाई करु शकत नाही. भारत सरकारने कारवाई करून देशाला लुटणाऱ्यांना जेलमध्ये टाकले पाहिजे, अशी मागणी नाना पटोले यांनी केली.
दरम्यान, गौतम अदानी यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेस खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली आहे. देशात मुख्यमंत्र्यांना तुरुंगात पाठवले जात आहे पण अदानींना काहीही होत नाही. हे उद्योजक पंतप्रधान मोदींना पूर्ण पाठिंबा देत आहेत. पंतप्रधान मोदी सतत त्यांचा बचाव करत आहेत. सरकार अदानींविरोधात कारवाई करत नाही. आता अमेरिकन एजन्सीने त्यांनी गुन्हा केल्याचे म्हटले आहे. पंतप्रधान मोदी हे अदानींच्या कंट्रोलमध्ये आहेत, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.