“सध्याची परिस्थिती चांगली नाही, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी”; काँग्रेसची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2023 02:18 PM2023-07-13T14:18:00+5:302023-07-13T14:19:22+5:30
Congress Nana Patole Demands President Rule Maharashtra: सरकार तुपाशी आणि जनता उपाशी अशी परिस्थिती आहे. राज्यात कायदा-सुव्यवस्था राहिलेली नाही, अशी टीका करण्यात आली आहे.
Congress Nana Patole Demands President Rule Maharashtra: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी अचानकपणे बंडखोरी केली. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपावरून शिंदे-फडणवीस-पवार यांच्यात मतभेद असून, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या आमदार, समर्थकांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, यातच आता सध्याची परिस्थिती चांगली नाही. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी. राज्यपाल आणि राष्ट्रपतींनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, भाजपने महाराष्ट्राचा चेहरा विद्रुप केला आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार न करणे. ईडीची भिती दाखवून विरोधकांवर दबाव निर्माण करण्यात येत आहे. मलाईदार खात्यांसाठी खातेवाटप रखडला, असा दावा नाना पटोले यांनी केला. महाराष्ट्र सरकारने सुलतानी जी आर काढला. राज्यात रिक्त असलेल्या ठिकाणी निवृत्त झालेल्या शिक्षकांच्या करार करुन नियुक्ती करावी, तरुणांच्या ही कुऱ्हाड आहे. तरुणांवर आघात करणारे हे सरकार आहे, अशी घणाघाती टीका नाना पटोले यांनी केली.
१०५ आमदारांना निवडून दिल्याची चूक जनतेच्या लक्षात आली आहे
महाराष्ट्रातील सरकारला जनतेच्या प्रश्नाशी काही देणे-घेणे नाही. जनतेला मोठी आश्वासने देऊन भाजपवाले सत्तेत आले. १०५ आमदारांना निवडून दिल्याची चूक महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात आले आहे. ज्याप्रमाने अलीबाबा ४० चोरांची टीम होती. ते जनतेला लुटायचे, आज सरकारची तीच अवस्था आहे, असे टीकास्त्र नाना पटोले यांनी सोडले.
दरम्यान, सरकार तुपाशी आणि जनता उपाशी अशी परिस्थिती आहे. राज्यात कायदा-सुव्यवस्था राहिलेली नाही. ईडीए सरकारचा काँग्रेस निषेध करते, जनता निषेध करत आहे. म्हणून आम्ही राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केलेली आहे, असे नाना पटोले म्हणाले.