“बदलापूरची शाळा RSS विचारांची, CCTV फुटेज गायब, पोलिसांवर दबाव”; नाना पटोलेंचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 03:23 PM2024-08-22T15:23:15+5:302024-08-22T15:25:59+5:30
Congress Nana Patole News: बदलापूरची शाळा भाजपा आणि आरएसएसच्या विचारांची आहे. सरकार या विषयाचे राजकारण करत आहे, अशी टीका नाना पटोलेंनी केली.
Congress Nana Patole News: बदलापूरच्या शाळेतील घटनेनंतर आता राज्य सरकार अॅक्शन मोडवर आले आहे. शाळांमधील मुलामुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अनेक उपाययोजना करणारा आदेश शालेय शिक्षण विभागाने काढला. या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला २६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणावरून महाविकास आघाडीतील नेते महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल करत आहेत. यातच बदलापूरची शाळा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांची आहे. त्यामुळे पोलिसांवर दबाव आणला जात आहे, असा मोठा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
मीडियाशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, पोलीस कारवाई करत नाही, आरोपी पकडत नाही म्हणून जनआंदोलन निर्माण झाले. हा राजकारणाचा विषय नाही. सरकार या विषयाचे राजकारण करत आहे. महाराष्ट्र हा गुजरात धार्जिणा करण्याचा सत्ताधाऱ्यांकडून प्रयत्न सुरु आहे. बदलापूरची शाळा भाजपा आणि आरएसएसच्या विचारांची असल्याने पोलिसांवर दबाव आहे. शाळेतील सीसीटीव्ही फुटेज गायब करण्यात आले आहेत, असा गंभीर आरोप नाना पटोले यांनी यावेळी बोलताना केला.
दहा वर्षात सुमारे २२ हजार अत्याचाराच्या घटना
राज्यात २०१४ ते २०२४ या दहा वर्षात सुमारे २२ हजार अत्याचाराच्या घटना असल्याचा दावा करत, नाना पटोले यांनी लाडकी बहीण योजनेवरून सरकारवर निशाणा साधला. लाडकी बहीण योजनेच्या प्रचारासाठी चारशे कोटीहून अधिक निधीची उधळपट्टी करण्यात आली आहे. लोकांनी सांगितले की, तुमचे दीड हजार नको आमच्या मुली सुरक्षित हव्या आहेत. महाराष्ट्रातील सरकार असंविधानिक आहे. सरकारमधले तिघे तिजोरी पोखरत आहेत, अशी टीका नाना पटोलेंनी केली.
दरम्यान, बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून येत्या २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. अत्याचाराच्या घटनेने महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळीमा फासली गेली आहे. या प्रकरणी महाभ्रष्ट युती सरकारविरोधात जनतेने मोठ्या संख्येने या बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.