Cogress Nana Patole News: राहुल गांधी यांच्यावर बोलण्याची अनिल बोंडेची लायकी नाही, ते काही विद्वान नाही, त्यांना मंत्रीपद, खासदारकी कशी मिळाली हे आम्हाला माहिती आहे, योग्य वेळ आल्यावर ते जाहीर करू. अनिल बोंडे जी भाषा बोलले त्याच भाषेत काँग्रेसही उत्तर देऊ शकते. पण काँग्रेसची ती संस्कृती नाही. दोन महिन्यानंतर भाजपा युतीचे सरकार जाऊन महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे, त्यावेळी अनिल बोंडे कुठे असेल त्याचा त्यांनी विचार करावा. शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड, दिल्लीतील भाजपाचा माजी आमदार व नरेंद्र मोदी यांच्या सरकारमधील एक मंत्री यांनी केलेली विधाने अत्यंत निषेधार्ह आहेत. नरेंद्र मोदी, अमित शाह यांनी यावर गप्प बसणे याचा अर्थ त्यांचा याला पाठिंबा आहे असे दिसते, या शब्दांत नाना पटोले यांनी राहुल गांधींविरोधात केलेल्या विधानांचा समाचार घेतला.
मीडियाशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, राहुल गांधी यांना धमक्या दिल्या जात आहेत का? असा सवाल उपस्थित करून काँग्रेस कार्यकर्ते खासदार राहुल गांधी यांच्या केसालाही धक्का लावू देणार नाहीत. राहुल गांधी यांच्याबद्दल भाजपाचे नेते जी भाषा वापरत आहेत, धमक्या देत आहेत त्यावर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप आहे. या धमकीविरांवर गुन्हे दाखल करुन अटक करण्याची मागणी केली आहे पण महाभ्रष्ट युती सरकार कारवाई करत नाही. त्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते गुरुवारी राज्यभर रस्त्यावर उतरून राहुल गांधींना धमक्या देणाऱ्या भाजपच्या तालिबानी वृत्तीविरोधात तीव्र आंदोलन करणार आहेत, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली.
सरकारने यांच्यावर कठोर कारवाई करावी
गेल्या काही दिवसांपासून भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षांचे नेते लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांची हत्या करण्याच्या, त्यांना शारीरीक इजा पोहोचवण्याच्या धमक्या देत आहेत. हे अत्यंत गंभीर आहे. या संदर्भात काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधांना पत्र लिहिले आहे. अद्याप या धमकीबाजांवर कारवाई करण्यात आली नाही. एकनाथ शिंदेचा आमदार संजय गायकवाडने राहुल गांधीची जीभ कापणाऱ्यास बक्षीस जाहीर केले. भाजपा खासदार अनिल बोंडेने त्यांच्या जीभेला चटके देण्याचे वक्तव्य केले आहे. या गंभीर धमक्या असून सरकारने यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नाना पटोलेंनी केली.