मुंबई - सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्रातील सर्व सरकारी कार्यालयांत अधिकारी व कर्मचारी फोनवर हॅलो न म्हणता वंदे मातरम् म्हणत संभाषणाला सुरुवात करतील असं म्हटलं आहे. मुनगंटीवार यांच्या घोषणेला अनेकांनी विरोध केला आहे. वंदे मातरम् शिवाय दुसरा सर्वांना मान्य असेल, असा पर्याय द्या, अशा शब्दांत रझा अकादमीने सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या आदेशाला आक्षेप घेतला आहे. यानंतर आता काँग्रेसने आपल्या कार्यकर्त्यांना आपापसात भेटतांना व जनतेशी संवाद साधतांना 'जय बळीराजा' म्हणावं असं म्हटलं आहे.
"बळीराजा हा जगाचा पोशिंदा आहे" असं म्हणत काँग्रेसने आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Congress Nana Patole) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "राष्ट्रगीत - वंदे मातरम् हा आमचा स्वाभिमान आहे, मात्र बळीराजा हा जगाचा पोशिंदा आहे म्हणून यापुढे राज्यातील काँग्रेस नेते - कार्यकर्त्यांनी आपापसात भेटताना व जनतेशी संवाद साधताना ‘जय बळीराजा‘ म्हणावे..." असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
"'हॅलो' इंग्रजी म्हणून आवडत नाही मग मंत्री म्हणून खुर्चीत कसे बसणार?"
"'हॅलो' इंग्रजी म्हणून आवडत नाही मग मंत्री म्हणून खुर्चीत कसे बसणार?" असं काँग्रेसने म्हणत निशाणा साधला आहे. तसेच "सरकारने अक्कल गहाण ठेवली असे आम्ही म्हणणार नाही. कारण सरकार व अक्कल शब्द ही फारसी आहेत" असंही म्हटलं आहे. काँग्रेसचे नेते सचिन सावंत (Congress Sachin Sawant) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "'हॅलो' इंग्रजी म्हणून आवडत नाही मग मंत्री म्हणून खुर्चीत कसे बसणार? पलंगावर कसे झोपणार? खुर्ची, पलंग फारसी शब्द आहेत. बटाटा, कोबी, हापूस, पपई, पेरू, अननस, बिस्कीट खाऊ नका, पोर्तुगीज आहेत ते. सरकारने अक्कल गहाण ठेवली असे आम्ही म्हणणार नाही. कारण सरकार व अक्कल शब्द ही फारसी आहेत" असं सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.
सुधीर मुनगंटीवार यांनी सांस्कृतिक कार्यमंत्री झाल्याबरोबर हा महत्त्वाचा निर्णय घेतला. आजपर्यंत इंग्रजांनी दिलेला शब्द उपयोगात आणला आहे. मी फोन उचलल्याबरोबर ‘हॅलो’ म्हणतो. हा देश जेव्हा गुलामगिरीत होता, तेव्हा त्यांनी हा शब्द दिलेला होता. स्वातंत्र्यवीरांनी वंदे मातरम् म्हणत तिरंगा हातात घेऊन, या देशाचे स्वातंत्र्य मंगलकलशाच्या रूपाने दिले. पण अजूनही इंग्रजांची छाप काही कमी होत नाही, असे मुनगंटीवार यांनी म्हटले होते.