“शरद पवार-उद्धव ठाकरे आमच्यासाठी महत्त्वाचे, INDIA च्या मुंबई बैठकीला राहुल गांधी येणार”
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2023 04:54 PM2023-08-05T16:54:48+5:302023-08-05T16:57:52+5:30
INDIA Meeting In Mumbai: विरोधकांच्या इंडिया आघाडीच्या बैठकीचे आयोजन महाविकास आघाडी करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
INDIA Meeting In Mumbai: आगामी लोकसभा निवडणुकीआधी विरोधी पक्षांनी केंद्रातील मोदी सरकारविरोधात जोरदार तयारी सुरू केली आहे. विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची तिसरी बैठक आता मुंबईत होत आहे. २३ जून रोजी विरोधकांची बिहारच्या पाटणा येथे पहिली बैठक पार पडली. या बैठकीला देशातले १६ पक्ष एकत्र आले होते. त्यानंतर गेल्या महिन्यात १७ आणि १८ जुलै रोजी कर्नाटकच्या बंगळुरू शहरात विरोधकांची दुसरी बैठक पार पडली होती. याच बैठकीवेळी तिसरी बैठक मुंबईत होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
INDIA च्या मुंबईतील बैठकीचे यजमानपद शिवसेना ठाकरे गटाकडे देण्यात आले आहे. इंडिया आघाडीच्या मुंबईत होणाऱ्या बैठकीचे आयोजन महाविकास आघाडी करणार आहे. याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रसारमाध्यमांना महाविकास आघाडीच्या बैठकीविषयी माहिती दिली. तसेच मुंबईत होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीबाबत सांगितले. इंडिया आघाडीची आगामी म्हणजेच तिसरी बैठक मुंबईत ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी पार पडेल. महाविकास आघाडी या बैठकीचे आयोजन करत आहे, असे नाना पटोले यांनी सांगितले.
शरद पवार आणि उद्धव ठाकरे आमच्यासाठी महत्त्वाचे
महाविकास आघाडीतले तिन्ही पक्ष ठाकरे गट, शरद पवार गट आणि महाराष्ट्र काँग्रेसमधील प्रत्येकी पाच नेत्यांचे एक पथक तयार करण्यात आले आहे. हे १५ नेते बैठकीचे नियोजन करतील. काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण या पथकात असतील. आमच्याबरोबर उद्धव ठाकरे आहेत, शरद पवार आहेत. हे दोन नेते आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. यांच्याबरोबर मिळून आम्ही या बैठकीचे नियोजन करत आहोत. राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे या बैठकीला येणार आहेत, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली.
दरम्यान, मुंबईच्या बैठकीचे यजमानपद शिवसेना ठाकरे गटाकडे आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे आमचे सहकारी आहेत. आम्ही एकत्र काम करणार आहोत. पण कार्यक्रमाचे यजमानपद शिवसेना ठाकरे गटाकडे असेल, असे आमचे ठरले आहे. प्रत्येकाकडे कोणत्या जबाबदाऱ्या असतील? याचे वाटपही झाले आहे. पाटणा आणि बंगळुरूप्रमाणे ही बैठकी यशस्वीपणे पार पडेल, असा विश्वास ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.