“किती जण काँग्रेसच्या संपर्कात याची भाजपाला कल्पनाही नाही, एकच हातोडा मारु”: नाना पटोले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2024 05:48 PM2024-02-23T17:48:36+5:302024-02-23T17:48:48+5:30

Congress Nana Patole News: महायुतीचे वातावरण राज्यात कुठेच नाही ते फक्त जाहिरातीतच दिसत आहे, असा दावा नाना पटोलेंनी केला.

congress nana patole reaction about many leader left the party and join bjp or mahayuti | “किती जण काँग्रेसच्या संपर्कात याची भाजपाला कल्पनाही नाही, एकच हातोडा मारु”: नाना पटोले

“किती जण काँग्रेसच्या संपर्कात याची भाजपाला कल्पनाही नाही, एकच हातोडा मारु”: नाना पटोले

Congress Nana Patole News: आगामी लोकसभा निवडणुका जशा जवळ येऊ लागल्या आहेत, तशी काँग्रेस पक्षाला एकामागून एक गळती लागल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबई काँग्रेसचे मोठे नाव असलेले मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकी यांनी पक्षाला रामराम केला. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपामध्ये प्रवेश केला. यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया देताना, भाजपाचे अनेजण काँग्रेसच्या संपर्कात आहेत, असा दावा केला आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना, काँग्रेसमधून काही लोक बाहेर जात आहेत, भाजपा प्रवेशाच्या चर्चाही राजकीय वर्तुळात आहेत, याबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना, सत्तेच्या जोरावर त्यांना जेवढे घ्यायचे आहेत तेवढे घेऊ द्या, त्यांच्या पक्षातील कितीजण आमच्या संपर्कात आहेत, याची त्यांना कल्पना नाही. सत्तेच्या जोरावर जेवढा खेळ खेळायचा तेवढा त्यांना खेळू द्या, आम्ही एकच हातोडा मारू मग त्यांना कळेल, असे नाना पटोले म्हणाले.

भाजपाला सत्तेतून हद्दपार करणे हाच मुख्य उद्देश

जागावाटपावरून महाविकास आघाडीत कसलेही मतभेद वा गोंधळ नसून गोंधळ हा महायुतीत आहे, त्यांच्यात काहीच ताळमेळ नाही. मविआतील सर्व मित्र पक्षांशी चर्चा सुरु असून बहुतांश जागा निश्चित झाल्या आहेत, लवकरच अंतिम निर्णय जाहीर केला जाईल. भाजपाला सत्तेतून हद्दपार करणे हाच महाविकास आघाडीचा मुख्य उद्देश आहे आणि आम्ही महायुतीचा मोठा पराभव करु, असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला.

महायुतीचे वातावरण राज्यात कुठेच नाही

महायुतीचे वातावरण राज्यात कुठेच नाही ते फक्त जाहिरातीतच दिसत आहे. जनतेच्या पैशाची उधळपट्टी करत वर्तमानपत्र, टीव्ही, सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी सुरु आहे. परंतु जनभावना मात्र वेगळ्या आहेत. निवडणुकीत महाराष्ट्रातील जनता भाजपा व त्यांच्या मित्रपक्षांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. बारामतीच्या जागेवरही शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच उमेदवार निवडून येणार आहे. भाजपा व त्यांचे मित्रपक्ष मीडियातून वातावरण निर्मिती करत आहेत प्रत्यक्षात चित्र वेगळे आहे, असा दावा नाना पटोलेंनी केला.

दरम्यान, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला तुतारी हे चिन्ह मिळाले आहे, एका हातात मशाल व दुसऱ्या हातात तुतारी हा भाजपाच्या तानाशाहीला संदेश आहे. या तुतारीत अत्याचारी व्यवस्थेला संपवण्याची क्षमता आहे. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जन्म दिला परंतु या अत्याचारी व्यवस्थेने त्यांचा पक्ष व घड्याळ चिन्हही चोरून घेतले,असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.
 

Web Title: congress nana patole reaction about many leader left the party and join bjp or mahayuti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.