“ड्रग माफिया ललित पाटीलचा खरा मास्टरमाईंड कोण?”; काँग्रेसची थेट विचारणा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2023 02:55 PM2023-10-18T14:55:12+5:302023-10-18T14:56:52+5:30
Congress Nana Patole News: भाजप सरकारच्या काळात ड्रग्जचा काळा धंदा करण्यांना ‘अच्छे दिन’ आले आहेत, अशी टीका करण्यात आली आहे.
Congress Nana Patole News: महाराष्ट्र एक सुसंस्कृत व प्रगत राज्य असून महाराष्ट्राच्या नावलौकीकाला काळीमा फासण्याचे काम भाजप सरकार करत आहे. राज्यात मागील काही दिवसांत ड्रग्जचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. एवढा मोठा ड्रग्जचा धंदा राजकीय आशिर्वाद असल्याशिवाय होऊच शकत नाही. ड्रगच्या काळ्या धंद्यातील ललीत पाटील हा एक प्यादे आहे, या प्रकरणातील मास्टरमाईंड कोण? त्याचा शोध लागला पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अद्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
ड्रग माफिया ललित पाटीलला मुंबई पोलिसांनी अटक केल्याबद्दल मुंबई पोलिसांचे अभिनंदन करुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, नाशिकमध्ये ड्रग्जचा मोठा साठा जप्त करण्यात आला होता, त्यानंतर सोलापूरातील एमआयडीसीमध्येही ड्रग्जचा साठा सापडला. महाराष्ट्रात अशा प्रकारे ड्रग्जचे साठे सापडणे हे महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी घटना आहे. या ड्रग प्रकरणातील ललित पाटील हा पुण्याच्या ससून रुग्णालयात सर्व सोयींचा उपभोग घेत होता हे समोर आले आहे. या ललित पाटीलला पळवून लावण्यात आल्याचे आम्ही आधीच सांगितले होते. आज आमचे म्हणणे खरे ठरले असून ललित पाटील स्वतःच सांगत आहे की त्याला पळवून लावण्यात आले होते. या सर्व प्रकरणाचा छडा लागला पाहिजे. ड्रग्जच्या काळ्या धंद्याला कोणाचा आशिर्वाद आहे ? ललित पाटीलच्या मागे कोणती शक्ती काम करत आहे? हे उघड झाले पाहिजे, अशी मागणी नाना पटोले यांनी केली.
ड्रग्जचा काळा धंदा करण्यांना ‘अच्छे दिन’ आले
भाजपा सरकार तरुणांच्या हाताला काम देत नाही, बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे, सरकारी नोकर भरती केली जात नाही, खाजगी कंपन्यांकडून कंत्राटी पद्धतीने पदे भरुन तरुणांची थट्टा केली जात आहे, तर दुसरीकडे तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढून त्यांना बरबाद करण्याचे पाप भारतीय जनता पक्षाचे सरकार करत आहे. भाजप सरकारच्या काळात घोटाळेबाज, गुन्हेगार, दरोडेखोर, खुनी, बलात्कारी तसेच ड्रग्जचा काळा धंदा करण्यांना ‘अच्छे दिन’ आले आहेत. हे सरकार जनतेच्या मुळावर उठले आहे, महाराष्ट्राला बदनाम करणाऱ्या या माफियांचा तसेच त्यांच्यामागच्या शक्तीचा शोध लागला पाहिजे असेही पटोले म्हणाले.