मुलगा CM व्हावा ही अजितदादांच्या आईची इच्छा; नाना पटोलेंचे थेट भाष्य म्हणाले, “महायुतीत...”
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2023 02:55 PM2023-11-05T14:55:40+5:302023-11-05T15:00:31+5:30
Nana Patole News: मुलगा मुख्यमंत्री व्हावा, अशी इच्छा अजित पवारांच्या आईने बोलून दाखवल्यावर यावरून राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.
Nana Patole News: राज्यात एकीकडे विविध मुद्द्यांवरून राजकीय वातावरण तापलेले असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत पुन्हा एकदा चर्चांना उधाण आल्याचे पाहायला मिळत आहे. ग्रामपंचायत निवडणुकांसाठी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर अजित पवार यांच्या मातोश्री आशा पवार यांनी आपला मुलगा मुख्यमंत्री व्हावा, अशी इच्छा बोलून दाखवली. यानंतर आता यावरून राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी याप्रकरणी सूचक भाष्य केले आहे.
मी १९५७ पासून काटेवाडीत मतदान करते. पूर्वीच्या काटेवाडीत आणि आताच्या काटेवाडीत भरपूर बदल झाले आहेत. राज्यातील अनेकांना अजित पवार मुख्यमंत्री व्हावे, असे सगळ्यांना वाटते. तसे आई म्हणून माझ्यादेखत मुलाने मुख्यमंत्री व्हावे, असे वाटते. माझे वय आता ८६ झाले आहे. त्यामुळे इतरांप्रमाणे मला अजित पवारांना मुख्यमंत्री झालेले बघायला आवडेल. लोकांनी भरभरुन प्रेम दिले. त्यामुळे आता ‘दादा’ने मुख्यमंत्री व्हावे, हीच आपली इच्छा राहिली आहे, असे आशा पवार यांनी सांगितले. यावर नाना पटोले यांनी मोजक्या शब्दांत पण नेमकी प्रतिक्रिया दिली.
त्यात काहीच चूक नाही, पण...
अजित पवार यांच्या मातोश्रींच्या इच्छेबाबत नाना पटोले यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. मीडियाशी बोलताना, अजित पवार यांच्या आईला मुलगा मुख्यमंत्री व्हावा असे वाटत असेल, त्यात काहीच चूक नाही. मात्र महायुतीमध्ये अजित पवार यांना संधी मिळेल, असे वाटत नाही, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. तर, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही यावर भाष्य केले. अजितदादांच्या स्वप्नांसाठी त्यांच्या आईने प्रार्थना केली असेल तर ती स्वाभाविक आहे. आई म्हणून त्यांची प्रार्थना अजित पवारांच्या स्वप्नांना भरारी देणारी ठरो. अजित पवारांचे मनपरिवर्तन आणि मतपरिवर्तन झाले तर त्यांचे स्वप्न नक्की पूर्ण होऊ शकेल, असे सूचक विधान वडेट्टीवार यांनी केले.
दरम्यान, अजित पवारांच्या आईच्या इच्छेबाबत विचारले असता सुप्रिया सुळे म्हणाल्या की, अर्थातच कुठल्या आईला तसे वाटणार नाही, असे सांगत एका वाक्यात प्रतिक्रिया दिली. अजित पवार यांच वय लहान आहे. मुख्यमंत्री होण्याची अपेक्षा आणि आकांक्षा असणे हे काही गैर नाही. पण शेवटी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याच नेतृत्वात पुढची निवडणूक लढवली जाणार आहे, अजितदादांचे वय लहान आहे त्यांना पुढच्या काळात संधी मिळू शकते, असे शिंदे गटाचे नेते आणि मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटले आहे.