“भाजपची ही खेळी त्यांच्यावरच उलटेल, सत्याचा विजय होईल”; नाना पटोलेंचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2022 07:06 PM2022-06-21T19:06:16+5:302022-06-21T19:06:54+5:30

भाजप केंद्रातील सत्तेचा दुरुपयोग करीत दबाबतंत्राचा वापर करून राज्यातील सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न करीत आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे.

congress nana patole reaction over shiv sena eknath shinde revolt and criticised bjp | “भाजपची ही खेळी त्यांच्यावरच उलटेल, सत्याचा विजय होईल”; नाना पटोलेंचे टीकास्त्र

“भाजपची ही खेळी त्यांच्यावरच उलटेल, सत्याचा विजय होईल”; नाना पटोलेंचे टीकास्त्र

Next

महाराष्ट्रात आताच्या घडीला अनेक राजकीय घडामोडी घडताना दिसत आहे. अनेक नाट्यमय वळणे याला लागत आहेत. शिवसेनेचे मंत्री आणि ठाण्यातील नेते बडे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारले आहे. त्यांच्यासोबत ३५ आमदार असल्याचे सांगितले जात आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेसह राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. यातच आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी यावर भाष्य केले आहे. भाजपची ही खेळी त्यांच्यावर उलटेल. सत्याचा विजय होईल, अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे. 

भाजप हा पक्ष केंद्रातील सत्तेचा दुरुपयोग करीत दबाबतंत्राचा वापर करून राज्यातील सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न करीत आहे. भाजपची ही खेळी त्यांच्यावरच उलटेल. केंद्रीय यंत्रणांचा वापर राजकारणासाठी करणे, सत्ताप्राप्तीतून पैसा कमावणे आणि पैशातून पुन्हा सत्ता प्राप्त करणे, अशी पद्धत भाजपने अंगीकारली आहे. ही बाब भारतीय लोकशाहीसाठी घातक आहे, या शब्दांत नाना पटोले यांनी भाजपवर निशाणा साधला. 

सत्याचा विजय होईल

ऊन, सावली हा निसर्गाचा नियम आहे. सत्याचा विजय होईल. विधानपरिषदेत काँग्रेसची मते फुटली आणि काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला. त्यासंदर्भातील अहवाल लवकरच पक्षश्रेष्ठींकडे सादर केला जाईल, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली. विधान परिषदेत काँग्रेसला मोठा धक्का बसला. काँग्रेसचे उमेदवार भाई जगताप विजयी झाले, तर चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला. विधान परिषदेचा निकाल पाहता काँग्रेसला आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. काँग्रेसने आपल्या उमेदवारांना मतांचा कोटा ठरवून दिला असताना प्रत्यक्षात मिळालेल्या मतांमध्ये फरक दिसला. काँग्रेसमध्ये अंतर्गत फूट पडली. हा निश्चितच गंभीर विषय आहे. याबद्दल चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल. हायकमांडला कळविले जाईल, असे नाना पटोले यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर आता काँग्रेसच्या सर्व आमदारांना दिल्ली येथे तातडीने बोलाविण्यात आले आहे. या सर्व आमदारांची बैठक होणार आहे. बाळासाहेब थोरात यांच्या कार्यालयातून आमदारांना तसे फोन जात आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे. 
 

Web Title: congress nana patole reaction over shiv sena eknath shinde revolt and criticised bjp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.