Nana Patole News: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहे. महाविकास आघाडीत सांगलीच्या जागेवरून अद्यापही धुसपूस सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. सांगलीतील उमेदवारीची माहिती टीव्हीवरून मिळाली, अशा आशयाचे विधान करून शरद पवार यांनी आपली नाराजी व्यक्त केली. उमदेवारी न मिळाल्यामुळे विशाल पाटील यांनी काँग्रेसमधून बंडखोरी करत अपक्ष म्हणून अर्ज भरला. यानंतर आता विशाल पाटील यांच्यावर काँग्रेस पक्ष कारवाई करणार का, याबाबत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सूचक प्रतिक्रिया दिली.
मीडियाशी बोलताना नाना पटोले यांनी विशाल पाटील यांच्यावरील कारवाईबाबत भाष्य केले. विशाल पाटील यांच्यावर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. महाविकास आघाडीच्या आघाडी धर्मामध्ये कोणत्याही प्रकारचा वाद निर्माण होऊ देणार नाही. आम्ही सामंजस्याने याबाबत निर्णय घेत आहोत, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. तसेच बारामतीत सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात थेट लढत आहे. शरद पवार किंवा अजित पवार यांच्या कौटुंबिक वादात मी काहीही बोलणार नाही, असे नाना पटोले यांनी सांगितले.
नरेंद्र मोदी देशाची भूमिका ठामपणे मांडतात, पण चीनवर बोलायला घाबरतात
भारताच्या रुपयापेक्षा बांगलादेशाचे चलन पुढे गेले आहे. मग ते पुढे गेले का आपण पुढे गेलो? नरेंद्र मोदी देशाची भूमिका ठामपणे मांडतात. परंतु, चीनवर बोलायला घाबरतात. ही निवडणूक नरेंद्र मोदी विरुद्ध देशातील जनता अशी आहे. भाजप विरुद्ध देशातील जनता अशी आहे. नरेंद्र मोदींनी विकासाचे स्वप्न दाखवले. पण शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत, या शब्दांत नाना पटोले यांनी टीकास्त्र सोडले.
दरम्यान, राम सातपुते यांनी विधानसभेत मराठा समाजाचा धडधडीत अपमान केला. दोन वेळा हा अपमान केला आहे. त्यामुळे त्यांना आम्ही माफी मागायला सांगितली. राम नाव ठेवल्याने कोणी ‘श्रीराम’ बनत नाही, असा टोला नाना पटोले यांनी लगावला.