Nana Patole Replied BJP: भारतीय जनता पक्षाच्या धर्मांध व जातीय राजकारणाला जनता कंटाळली आहे. महागाई, बेरोजगारीने जनता मेटाकुटीला आली आहे, शेतकरी अस्मानी, सुलतानी संकटात पिचलेला आहे परंतु भाजपा सरकार त्याकडे लक्ष देत नाही. भाजपाच्या कारभाराला कंटाळलेल्या जनतेने विधान परिषद, विधानसभा पोटनिवडणुक व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्यांना जागा दाखवून दिली आहे. आपल्या पक्षाचे अस्तित्व टिकवण्यासाठी ईडी, सीबीआयच्या माध्यमातून दडपशाही व फोडाफोडीचे राजकारण करुन पक्ष वाढवण्याचा 'उद्योग' भाजपा करत आहे, असे प्रत्युत्तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहे.
भारतीय जनता पक्षाचा समाचार घेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, दुसऱ्यांचे पक्ष फोडून स्वत:चा पक्ष वाढत नसतो. पक्ष वाढवण्यासाठी संघटना मजबूत करावी लागते. तसेच जनतेचा पाठिंबा मिळावा लागतो. परंतु भाजपचा जनाधार घटत आहे. कर्नाटकात काय परिस्थिती आहे हे फडणवीसांनी आधी पहावी. देवेंद्र फडणवीस सारखे नेते दररोज ‘या पक्षातून लोक येणार त्या पक्षातून लोक येणार’, अशा गमजा मारत असतात. देशात व महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाला जनतेचा पाठिंबा वाढत आहे, असे नाना पटोले यांनी ठामपणे सांगितले.
राहुल गांधींवर बोलल्याशिवाय झोपूच लागत नाही
राहुल गांधी यांच्या बदनामीसाठी भाजप करोडो रुपये खर्च करते तरीही राहुल गांधींना मोठे जनसमर्थन मिळत आहे. काँग्रेस पक्ष संपला आहे, तो दुर्बिणीतूनही दिसत नाही, राहुल गांधींना गांभिर्याने घेण्याची गरज नाही म्हणणाऱ्या भाजपच्या नेत्यांना राहुल गांधींवर बोलल्याशिवाय झोपूच लागत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाला चोख उत्तर देऊ शकणारे देशात आज राहुल गांधी हेच एकमेव नेते आहेत. राहुल गांधींना भाजपा व मोदी घाबरते म्हणून तर डझनभर मंत्री, संत्री दररोज राहुल गांधींवर टीका करत असतात, या शब्दांत नाना पटोले यांनी घणाघात केला.
राहुल गांधी यांना महाराष्ट्रात येण्यापासून कोणीही रोखू शकत नाही
राहुल गांधी यांचा मुंबई, महाराष्ट्रातील दौरा अद्याप नक्की झालेला नाही परंतु ते लवकरच महाराष्ट्राला भेट देतील. राहुल गांधी यांना महाराष्ट्रात येण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना त्यांच्या पक्षातही काही किंमत नाही, ते राहुल गांधींना काय रोखणार? राहुल गांधींना जेव्हा महाराष्ट्रात यायचे त्यावेळी ते येणारच व काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या धुमधडाक्यात त्यांचे स्वागत करतील. राहुल गांधी यांना महाराष्ट्रात येण्यासाठी भाजप, बावनकुळे किंवा कोणाच्या परवानगीची गरज नाही. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांचा अपमान करणाऱ्या भाजपाच्या नेत्यांनी माफी मागावी आणि त्यानंतरच बोलावे, असा टोलाही नाना पटोले यांनी लगावला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"