Nana Patole Vs BJP: देशात आणीबाणी लागू करण्याच्या घटनेला ४८ वर्षे पूर्ण झाली आहेत. यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या इतिहासात कधीच आणीबाणी विस्मरणात जाणार नाही, अशा शब्दांत आणीबाणीवर टीका केली आहे. याचबरोबर मोदींनी आणीबाणीला विरोध करणाऱ्या नागरिकांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. भाजप नेत्यांनीही आणीबाणीवरून टीकास्त्र सोडले. यावर काँग्रेसकडून पलटवार करण्यात आला असून, देशातील ९ वर्षापासूनच्या अघोषित आणीबाणीवर भाजपाने आधी बोलावे, या शब्दांत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हल्लाबोल केला.
मुंबईत मीडियाशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी कोणत्या परिस्थितीत आणीबाणी लागू केली होती याचा भाजपने निट अभ्यास करायला पाहिजे. भाजपला इतिहासच नाही त्यावर ते काय बोलणार? १९७५ मध्ये अमेरिका-व्हिएतनाम युद्ध सूरू होते आणि त्याच वेळी देशामधील लोकशाही संपुष्टात आणण्यासाठी काही लोकांनी षडयंत्र रचले होते, काही लोक जाणीवपूर्वक चिथावणी देत होते. इंदिराजींनी आणीबाणी लावली नसती तर देशात लोकशाही राहिली नसती. इंदिराजी गांधी यांनी १८ महिन्यानंतर आणीबाणी उठवली व निवडणुकाही घेतल्या. इंदिराजी गांधी लोकशाहीच्या पाईक होत्या म्हणून लोकशाही वाचली. काँग्रेस पक्षाने आणीबाणीबद्दल नंतर माफीही मागितली आहे, असे नाना पटोले म्हणाले.
देशातील ९ वर्षापासूनच्या अघोषित आणीबाणीवर भाजपने आधी बोलावे
पण आता देशात काय चालले आहे? आणीबाणीपेक्षाही भयानक परिस्थिती आहे. लोकशाही व संविधान धाब्यावर बसवून कारभार सुरु आहे. ९ वर्षापासून देशात अघोषित आणीबाणी सुरू आहे, त्यावर भाजपाने आधी बोलले पाहिजे. मोदी सरकारच्या विरोधात बोलणा-यावर कारवाई केली जाते, सरकारी तपास यंत्रणाचा वारेमाप गैरवापर सुरु आहे, विरोधकांची दडपशाही सुरु असून सरकारविरोधात बोलणाऱ्यांची मुस्कटदाबी केली जात आहे. आणीबाणीच्या नावाखाली भाजपा तरूणांना भडकवत आहे ते त्यांनी थांबवावे. भाजपला आणीबाणीवर बोलण्याचा अधिकार नाही, अशी टीका नाना पटोले यांनी केली.
दरम्यान, राज्यातील शिंदे-फडणीस सरकार हे घोषणाबाज व जाहिरातबाज सरकार आहे. काम काहीच करत नाही फक्त गाजावाजा करत असतात. पहिल्याच पावसाने या सरकारच्या दाव्यांची पोलखोल केली. मुंबईत जागोजागी पाणी साचून मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले, ६ मुंबईकरांना हकनाक जीव गमवावा लागला. मुंबईत जागोजागी खड्डे खणून ठेवले आहेत. नालेसफाईसह मुंबईच्या कामांवर कोट्यवधी रुपये खर्च केले पण मुंबई पाण्यात गेलीच, मग खर्च केलेला पैसा गेला कुठे? असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केला आहे.