Nana Patole: “जनाधार घसरल्याने भाजप नेत्यांचे संतुलन बिघडलेय”; नाना पटोलेंचे टीकास्त्र 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2022 06:03 PM2022-04-04T18:03:11+5:302022-04-04T18:04:25+5:30

Nana Patole: ईडी आता हजार-पाचशे रुपयांची चौकशी करणार का आणि ती भाजपच्या इशाऱ्यावर होणार का, असा सवाल नाना पटोलेंनी केला आहे.

congress nana patole replied bjp chandrakant patil over ed action in kolhapur bypoll election | Nana Patole: “जनाधार घसरल्याने भाजप नेत्यांचे संतुलन बिघडलेय”; नाना पटोलेंचे टीकास्त्र 

Nana Patole: “जनाधार घसरल्याने भाजप नेत्यांचे संतुलन बिघडलेय”; नाना पटोलेंचे टीकास्त्र 

googlenewsNext

मुंबई: आताच्या घडीला विविध मुद्द्यांवरून राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. त्यात आता कोल्हापूरमधील पोटनिवडणुकांमुळे आरोप-प्रत्यारोपांना आणधी धार आल्याचे दिसत आहे. कोल्हापूर पोटनिवडणुकीत बाजी मारण्यासाठी सर्वच पक्ष उत्सुक असून, राजकीय नाट्यही रंगताना पाहायला मिळत असल्याचे सांगितले जात आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलेल्या टीकेवर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी पलटवार केला आहे. जनाधार घसरल्याने भाजप नेत्यांचे संतुलन बिघडले असल्याची टीका नाना पटोले यांनी केली आहे. 

काही लोकांनी मतदारांना पेटीएमद्वारे पैसे देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे मतदारांनो तुम्ही हे पैसे घेऊ नका. आम्ही ईडीकडे या प्रकाराची तक्रार करणार आहोत. त्यामुळे तुमचीही चौकशी होऊ शकते, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते. यावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, ईडीसारखी तपास यंत्रणा तर थेट भाजपची शाखा असल्यासारखे काम करत आहे. राजकीय नेत्यांवर कारवाईसाठी गैरवापर करण्यात येत असलेल्या ईडीची धमकी आता भाजपने कोल्हापुरातील मतदारांनाच दिली असून भाजपच्या नेत्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे, असा पलटवार नाना पटोले यांनी केला. 

भाजपला कोल्हापुरात पराभव दिसतोय

कोल्हापुरातील मतदारांना तुमची ईडीकडून चौकशी होईल अशी धमकी देणे दुर्दैवी आहे. भाजपचा जनाधार घसरला आहे. स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीत भाजपला महाराष्ट्राच्या जनतेने जागा दाखवून दिलेली आहे. कोल्हापुरातील पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्ष जिंकणार हे निश्चित आहे. भाजपला कोल्हापुरात पराभव दिसत असल्याने निराशेपोटी चंद्रकांत पाटील यांनी थेट मतदारांनाच धमकी दिली आहे. आता ईडी हजार-पाचशे रुपयांची चौकशी करणार का आणि ती चौकशी भाजपच्या इशाऱ्यावर होणार का, अशी विचारणा नाना पटोले यांनी केली आहे. 

भाजपला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही

महाराष्ट्रात भाजपाला सत्ता मिळाली नसल्याने त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. या नैराश्येतून ते केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करुन भितीचे वातावरण निर्माण करत आहेत. चंद्रकांत पाटील यांचे मानसिक संतुलन बिघडले असल्याने ते अशी वक्तव्ये करत असतात. कोल्हापुरची स्वाभिमानी जनता मात्र या पोटनिवडणुकीत चंद्रकांत पाटील व भाजपला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला.
 

Web Title: congress nana patole replied bjp chandrakant patil over ed action in kolhapur bypoll election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.