Congress Nana Patole News: राहुल गांधी यांनी पदयात्रा काढून संपूर्ण भारत देश पिंजून काढला. कन्याकुमारी ते काश्मीर ४ हजार किलोमीटरची पदयात्रा काढली. सर्व समाजाच्या लोकांच्या वेदना जाणून घेतल्या, त्यानंतर मणिपूर ते मुंबई ६७०० किमीची भारत जोडो न्याय यात्रा काढली. राहुल गांधी यांनी ऊन, वारा, पावसाची तमा बाळगली नाही. सतत चालत राहिले ते केवळ देशातील जनतेसाठी, त्यामुळे गरम झाले की राहुल गांधी परदेशात जातात असे बाष्कळ विधान करुन एकनाथ शिंदे यांनी अकलेचे तारे तोडले आहेत. गद्दारी करुन सत्ता मिळवणाऱ्यांना राहुल गांधी, गांधी कुटुंबाचा त्याग, बलिदान काय कळणार, असा पलटवार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला.
मीडियाशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या मदतीने बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडून गद्दारी केली. भाजपाच्या मदतीने सुरत व तेथून गुवाहाटीला जाऊन महाविकास आघाडीचे सरकार पाडले. ईडी कारवाईच्या भितीने गद्दारी करून पक्ष चोरणाऱ्यांनी काँग्रेस व राहुल गांधी यांच्याबद्दल बोलू नये. भाजपाच्या वळचणीला गेलेल्या एकनाथ शिंदे यांनी काहीही केले तरी त्यांच्या कपाळावरचा गद्दारीचा शिक्का कधीही पुसला जाणार नाही, या शब्दांत नाना पटोलेंनी सडकून टीका केली.
राहुल गांधीच्या लोकप्रियतेमुळे भाजपा, मित्रपक्षांचे संतुलन ढासळले
लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भाजपा व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. पराभवाच्या भीतीने ते सैरभैर झाले असून काँग्रेस व इंडिया आघाडीवर खालच्या पातळीवर येऊन टीका करत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाजपाच्या मेहरबानीवर बसवलेले मुख्यमंत्री आहेत. भाजपा जेवढी चावी देती ते तेवढेच बोलू शकतात. परंतु काँग्रेस पक्ष व राहुल गांधी यांच्याबद्दल बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी मर्यादा सोडू नये. गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही. राहुल गांधींवर टीका केल्याने एकनाथ शिंदेंच्या कपाळावरचा गद्दारीचा शिक्का पुसला जाणार नाही, अशी टीका नाना पटोलेंनी केली.
दरम्यान, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधीवर केलेल्या टीकेचा नाना पटोले यांनी खरपूस शब्दांत समाचार घेतला. बावनकुळे यांना त्यांच्या पक्षातच कोणी विचारत नाही. ते दररोज फक्त विरोधी पक्षांच्या नेत्यांवर गरळ ओकत असतात, देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना तेवढेच काम दिलेले आहे. राहुल गांधी यांच्यावर बोलण्याएवढे बावनकुळे यांची उंची नाही. राहुल गांधी यांच्याबद्दल बोलण्याआधी बावनकुळे यांनी त्यांच्या पक्षाचे सर्वोच्च नेते नरेंद्र मोदींनी विरोध पक्षांचे नेते, महिला यांच्याबद्दल कसे बोलावे याचे धडे द्यावेत मग दुसऱ्यांना शिकवावे, असे नाना पटोले म्हणाले.