“शिवरायांच्या पुतळ्याप्रकरणी माफी मागून पंतप्रधानांनी चूक कबुल केली”: नाना पटोले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 06:53 PM2024-08-30T18:53:04+5:302024-08-30T18:54:41+5:30
Congress Nana Patole News: महाराष्ट्राची शिवप्रेमी जनता महायुतीला माफ करणार नाही. शिंदे व फडणवीसांनी सत्तेतून पायउतार व्हावे, अशी मागणी नाना पटोलेंनी केली.
Congress Nana Patole News: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामातील भ्रष्टाचारामुळे महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली असतानाही महा भ्रष्ट भाजपा युती सरकारला लाज वाटली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. पण अवघ्या ८ महिन्यातच तो पुतळा कोसळला, हा केवळ पुतळा कोसळला नाही तर महाराष्ट्राचा स्वाभिमान धुळीस मिळाला. जनतेच्या तीव्र भावना लक्षात घेऊन नरेंद्र मोदींनी माफी मागितली याचाच अर्थ त्यांनी चूक मान्य केली आहे, पण महाराष्ट्रातील शिवप्रेमी जनता यांना माफ करणार नाही, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
मीडियाशी बोलताना नाना पटोले यांनी भाजपा सरकारचा खरपूर समाचार घेतला. पंतप्रधान मोदींच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी घाईघाईने महाराजांचा पुतळा बसवला. वास्तविक पाहता महापुरुषांचा भव्य पुतळा उभारताना सर्व बाबींचा अभ्यास करावा लागतो परंतु भाजपा सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. अनुभव नसलेल्या व्यक्तीकडे पुतळ्याचे काम दिले. पुतळ्यासंदर्भात सांस्कृतिक विभागाने दिलेल्या सूचनांकडे कानाडोळा केला. परिणामी निकृष्ट दर्जाचे काम केले म्हणून पुतळा कोसळला, असे पटोले म्हणाले.
केवळ मतांसाठी महाराजांच्या नावाचा वापर
शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून विरोधकांनी राजकारण करु नये या एकनाथ शिंदे व फडणवीसांच्या आवाहनाला उत्तर देत नाना पटोले म्हणाले की, भारतीय जनता पक्षाने सातत्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला आहे. केवळ मतांसाठी महाराजांच्या नावाचा वापर केला आहे. सत्तेसाठी लाचार झालेला भाजपा कोणत्याही विषयाचे राजकारण करते. मविआचे सरकार खाली खेचण्यासाठी काय काय प्रकार केले हे देशाने पाहिले आहे, त्यामुळे दुसऱ्यांना सल्ला देण्याआधी त्यांनी स्वतःचा चेहरा आरशात पाहावा, असा टोला नाना पटोले यांनी लगावला.
दरम्यान, शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत, महाराष्ट्राचा स्वाभिमान आहेत. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला ठेच पोहचवणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची जबाबदारी घेऊन सत्तेतून पायउतार झाले पाहिजे अन्यथा जनता त्यांना सत्तेतून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही, असे पटोले म्हणाले.