“भटकती आत्मा तर नरेंद्र मोदीच, प्रधानमंत्री कमी अन् प्रचारमंत्रीच जास्त”; नाना पटोलेंची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2024 07:01 PM2024-04-30T19:01:04+5:302024-04-30T19:07:00+5:30
Congress Nana Patole: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर नाहक टीका करून वेळ वाया घालवू नये, अशी टीका नाना पटोलेंनी केली.
Congress Nana Patole: भटकती आत्मा तर नरेंद्र मोदीच आहेत. त्यांना चैनच पडत नाही. १० वर्ष ते फक्त प्रचारच करत आहेत. दिवसभर सारखे कपडे बदलून फोटोसेशन करणे, कधी समुद्राच्या खाली तर कधी हवेत. असा पंतप्रधान देशाने याआधी पाहिला नाही. १० वर्षात सत्तेत असताना मोदींनी काय केले ते सांगावे, देशाची संपत्ती विकून देश चालवला, रुपयाची घसरण झाली तो प्रति डॉलर ९० रुपयांवर गेला. शेतकऱ्यांना फसवले, महागाई, बेरोजगारी वाढवली त्याबद्दल नरेंद्र मोदी काहीच बोलत नाहीत फक्त धार्मिक मुद्द्यावर बोलून समाजात तेढ निर्माण करत आहेत, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
मीडियाशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, देवेंद्र फडणवीसांनी कोणताही शाप दिला तरी तो लागत नाही. धनगर, आदिवासी, मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मोठ्या घोषणा केल्या होत्या त्याचे काय झाले, त्यावर बोला. राज्यातील उद्योग गुजरातला पाठवले त्यावर बोला. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना काळीमा फासणाऱ्या फडणवीस यांना शाप देण्याचा कोणताही अधिकार नाही, असा खोचक टोला नाना पटोलेंनी लगावला.
खोके-बोके सरकार एकत्र येऊन सत्तेची मलई खाण्यात व्यस्त
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर नाहक टीका करून वेळ वाया घालवू नये. काँग्रेसने देश टिकवला, सांभाळला म्हणून शिंदे मुख्यमंत्री होऊ शकले पण मोदी सत्तेत आल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची धोरणे बदलली. जीएसटी लावून जनतेला लुटले. काँग्रेसने शेवटच्या माणसाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले. भाजपा तर या घटकला पुन्हा विकासाच्या बाहेर फेकत आहे. कांदा निर्यातबंदी उठवलेली नाही, शेतकऱ्यांना मदत केली नाही, पीक विम्याचे पैसे मिळत नाहीत त्यावर सरकारने बोलले पाहिजे. पुण्यात एमपीएससीच्या मुलांना भेडसावणाऱ्या समस्यांवर लक्ष घातले पाहिजे. राज्यात पाणी नाही, दुष्काळ पडला आहे त्याकडे मुख्यमंत्री व सरकारने लक्ष देण्याची गरज असताना खोके-बोके सरकार एकत्र येऊन सत्तेची मलई खाण्यात व्यस्त आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली.
दरम्यान, सातत्याने खोटे बोलत महाराष्ट्रभर फिरणारे नरेंद्र मोदीच खरे भटकते आत्मा आहेत. मोदींनी कोणती पदवी घेतली हे माहित नाही पण त्यांना जाहिरनामा वाचता येत नसेल तर काँग्रेस त्यांना समजवून सांगेल. काँग्रेसबद्दल सातत्याने खोटे बोलून नरेंद्र मोदींनी जनतेची दिशाभूल करून संभ्रम निर्माण करु नये. काँग्रेसने जातनिहाय जनगणना करण्याचे आश्वासन दिले आहे, तसेच सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक सर्वे करणार असल्याचे म्हटले आहे, असे नाना पटोले म्हणाले.