Congress Nana Patole News: लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर भारतीय जनता पक्ष १५०, जागाही जिंकू शकत नाही, हे स्पष्ट झाले आहे. पराभव होत असल्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही खात्री पटली असल्यानेच याच चिंतेतून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना एनडीएमध्ये सहभागी होण्याची जाहीर ऑफर दिली आहे. शरद पवारांची एनसीपी व उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला नकली म्हणून टीका करता आणि ठाकरेंबद्दल ममत्व दाखवता आणि शरद पवारांना जाहीर ऑफर देता म्हणजे नरेंद्र मोदी यांनीच पराभवावर शिक्कामोर्तब केले, असे प्रत्युत्तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले.
महाराष्ट्राचे एक दिग्गज नेते ४० वर्षांपासून फिरत आहेत. बारामतीच्या निवडणुकीनंतर ते खूप चिंतेत आहेत. त्यांनी एक विधान केले आहे जे मला वाटते की, त्यांनी अनेकांसोबत चर्चा करुन केले असेल. ते इतके हताश आणि निराश झालेत की त्यांना वाटत आहे की, ४ जूनच्या नंतर राजकारणात टिकून राहायचे असेल तर छोट्या राजकीय पक्षांना काँग्रेसमध्ये विलीन व्हायला हवे. याचा अर्थ असा की, जी नकली राष्ट्रवादी आणि शिवसेना आहे, त्यांनी काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा निर्णय घेतला आहे. ४ जूननंतर काँग्रेसमध्ये जाऊन मरण्यापेक्षा छातीठोकपणे अजित पवार आणि एकनाथ शिंदेंसोबत या. मोठ्या अभिमानाने स्वप्ने साकार होतील, अशी ऑफरच पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना नंदूरबार येथील जाहीर सभेत दिली. यावर नाना पटोलेंनी पलटवार केला.
नरेंद्र मोदी आता सत्तेत येत नाही, असा दावा खरा ठरत आहे
आधी पक्ष फोडले, ब्लॅकमेल केले आणि आता पुन्हा त्यांनाच आमच्यासोबत या, असे नरेंद्र मोदी सांगत आहोत. त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी मान्य करावे की, आता ते काही सत्तेत येत नाहीत. आलो तरी त्यांचा आधार घेऊनच येऊ शकतो. ४०० पार नाही. आता आमच्यावर तडीपाराची वेळ आलेली आहे. म्हणूनच आता शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना विनंती करत आहेत की, आमच्या बरोबर या. त्यामुळे नरेंद्र मोदी आता सत्तेत येत नाही, असा आम्ही जो दावा करत आहोत, तो दावा खरा ठरत आहे, असे नाना पटोले म्हणाले.
मोदी काहीही बोलले तरी आता त्याचा फारसा परिणाम होणार नाही
नरेंद्र मोदी घाबरलेले आहेत. सत्तेतून बाहेर जाण्याच्या भीतीने नरेंद्र मोदी अशा पद्धतीच्या ऑफर देत आहेत. भाजपाने लोकसभा निवडणुकीत सर्व प्रकारची कार्ड वापरली पण कोणतेच कार्ड चालले नाही, हिंदु-मुस्लीम कार्डही फेल गेले. त्यामुळे नरेंद्र मोदी यांना दररोज नवे कार्ड वापरावे लागत आहे. लोकशाहीमध्ये जनता सर्वश्रेष्ठ असते, नेता नाही. जनता आता नरेंद्र मोदींना कंटाळली आहे. त्यामुळे मोदी काहीही बोलले तरी आता त्याचा फारसा परिणाम होणार नाही, असे नाना पटोले म्हणाले.
४ जूनला केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार येणार
पराभवाची भीती स्पष्ट दिसत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रातच २९ जाहीर सभा घेत आहेत. मोदींच्या हातातून निवडणूक गेली आहे, हे यातून स्पष्ट होत आहे. ज्यांच्यावर कठोर टीका केली त्यांनाच ऑफर देण्याची वेळ नरेंद्र मोदी यांच्यावर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शरद पवारांना ऑफर देणे म्हणजे ४ जूनला केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार येणार या राहुल गांधी यांच्या विधानाला नरेंद्र मोदी यांचा दुजोराच आहे, असा दावा नाना पटोले यांनी केला आहे.