Rajya Sabha Election 2022: “काँग्रेसला चूक दाखवायची परंपरा सुरु आहे, मॅजिक फिगर येऊ दे मग...”; पटोलेंचे राऊतांना प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 04:10 PM2022-05-30T16:10:12+5:302022-05-30T16:10:53+5:30

देशाची एकात्मता आणि त्या विचाराला, भाषेला मानणारा उमेदवार हायकमांडने दिल्याचे नाना पटोले यांनी म्हटले आहे.

congress nana patole replied shiv sena sanjay raut over rajya sabha election 2022 | Rajya Sabha Election 2022: “काँग्रेसला चूक दाखवायची परंपरा सुरु आहे, मॅजिक फिगर येऊ दे मग...”; पटोलेंचे राऊतांना प्रत्युत्तर

Rajya Sabha Election 2022: “काँग्रेसला चूक दाखवायची परंपरा सुरु आहे, मॅजिक फिगर येऊ दे मग...”; पटोलेंचे राऊतांना प्रत्युत्तर

googlenewsNext

मुंबई: आताच्या घडीला राज्यसभा (Rajya Sabha Election 2022) निवडणुकीवरून देशातील राजकारण तापल्याचे दिसत आहे. अनेक नेते राज्यसभा निवडणुकीकडे डोळे लावून बसले होते. मात्र, काहींच्या पदरी निराशा पडल्याचे दिसत आहे. काँग्रेसमधून अशा पद्धतीचे सूर उमटू लागल्याचे सांगितले जात आहे. राज्यातही राज्यसभा निवडणुकीवरून कलगीतुरा रंगत असल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काँग्रेसवर केलेल्या टीकेचा महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी समाचार घेतला आहे. 

राज्यसभेच्या जागेसाठी काँग्रेसने अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष इम्रान प्रतापगढी यांना उमेदवारी जाहीर केल्याने राज्यातील पक्षाच्या नेत्यांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. संजय राऊत यांनी यावर भाष्य करत, स्थानिक उमेदवार दिला असता तर काँग्रेसला अधिक बळकटी मिळाली असती, असे स्पष्ट मत मांडले. काँग्रेसची चूक नसेल तरी चूक दाखवण्याची परंपरा सध्या सुरु आहे, अशा शब्दांत नाना पटोले यांनी टीकाकारांना उत्तर दिले आहे.

मॅजिक फिगर एकदा लोकांसमोर येऊ दे

केंद्रातील कमकुवत सरकारने आठ वर्षांत देशाची वाट लावली असून, त्या सगळ्या गोष्टी लपवण्यासाठी काँग्रेसच्या निर्णयावर कुरघोडी करण्याचा जो प्रयत्न आहे, त्यातील ही एक मानसिकता आहे. आमचे काँग्रेसचे उमेदवार इम्रान प्रतापगढी यांनी मराठीत शपथ घेतली आहे. त्यामुळे देशाची एकात्मता आणि त्या विचाराला, भाषेला मानणारा उमेदवार हायकमांडने दिला. निवडणुकीला काही जास्त दिवस राहिलेले नाहीत. महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर दिवसाही स्वप्न पाहणारे विरोधक आम्ही पाहिले आहेत. प्रत्येक १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला झेंडा फडकवण्याचे त्यांचे स्वप्न या राज्याच्या जनतेला माहिती आहे. या निवडणुकीत मतदान उघडपणे होते त्यामुळे ते दावा करत असलेली मॅजिक फिगर एकदा लोकांसमोर येऊ दे, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. राज्यसभेच्या निवडणुका बिनविरोध होतात, पण विरोधकांचा काही दावा असेल तर त्यावर काही बोलायचे नाही, असे नाना पटोले म्हणाले.

दरम्यान, नगमा आणि पवन खेरा यांनी आपली १८ वर्षांची तपस्या कमी पडल्याचे सांगत नाराजी जाहीर केल्याबद्दल विचारले असता ते म्हणाले की, मी श्रेष्ठ आहे असे मत मांडण्याचा सर्वांना अधिकार आहे, ते त्यांनी मांडले असेल. व्यक्तिगत मत मांडण्याचा अधिकार सर्वांना आहे. काँग्रेसमध्ये लोकशाही आहे, असा टोला पटोलेंनी लगावला आहे. 
 

Web Title: congress nana patole replied shiv sena sanjay raut over rajya sabha election 2022

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.