“वंचितने सातत्याने अपमान केला, टॉर्चर केले, पण तरी...”; नाना पटोलेंनी बोलून दाखवली खंत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2024 10:11 AM2024-04-05T10:11:50+5:302024-04-05T10:13:23+5:30
Congress Nana Patole News: वैयक्तिक अपमानापेक्षा देशाचे संविधान व लोकशाही महत्वाचे आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.
Congress Nana Patole News: वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडी सोबत घेण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले पण वंचितकडून त्यात अडथळे आणले गेले. नाना पटोले माईंड गेम करतो असा आरोप केला, टॉर्चर केले, अपमान केला गेला, असे असतानाही शेवटपर्यंत वंचितला मविआबरोबर घेण्याचा प्रयत्न केला. असे असताना वंचितने वेगळी भूमिका घेतली. पण, वैयक्तिक अपमानापेक्षा देशाचे संविधान व लोकशाही महत्वाचे आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.
भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी सातत्याने आपल्या महापुरुषांचा अपमान केला. संवैधानिक पदावर बसून भगतसिंह कोश्यारी यांनी सावित्रिबाई फुले, ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज या महापुरुषांचा अपमान केला. देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांनी महापुरुषांचा अपमान केला. राज्यातील धर्मांध शक्तीने शाहु, फुले, आंबेडकरांचे विचार संपवण्याचे काम केले आहे, अशी टीका नाना पटोलेंनी केली. ते मीडियाशी बोलत होते.
भाजपाकडून मतविभागणी करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात
भारतीय जनता पक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आर्थिक धोरण बदलत आहे. जीएसटीच्या माध्यमातून गरिबांकडून पैसे वसुल करून मुठभर श्रीमंतांचे खिसे भरत आहे. नोट बंदी व जीएसटीने देशाचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. काँग्रेस मित्रपक्षांचा पराभव करण्यासाठीच भाजपाकडून मतविभागणी करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात, असा आरोप नाना पटोलेंनी केला.
दरम्यान, निवडणुकीच्या तोंडावर जाती धर्माच्या नावाखाली भाजपा समाजात भांडणे लावत आहे. देशाचे स्वातंत्र, लोकशाही व संविधान धुळीस मिळवत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान संपवण्याचा भाजपाचा डाव आहे. हा डाव हाणून पाडा. काँग्रेसने सर्वांना समान अधिकार देण्याचे काम केले. सोनिया गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली युपीए सरकारने गरिबांसाठी अन्न सुरक्षा कायदा आणला. माहितीचा अधिकार कायदा आणला. मनरेगा योजना आणली. काँग्रेस पक्षच दलित, आदिवासी, अल्पसंख्याक समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहे. आपल्याला आमदार, खासदार मंत्री केले. मंत्री असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने राज्यभर न्याय भवन उभे केले. रमाई आवास योजना आणली. दलित, गरिब समाजाच्या कल्याणासाठी काम केले. खऱ्या अर्थाने मीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा वारसदार आहे, असे चंद्रकांत हंडोरे म्हणाले.