Maharashtra Politics: अजित पवार हे आमचेचे नेते आहेत, राष्ट्रवादीत फुट नसल्याचे शरद पवार यांनी सांगत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. फूट पडली याचा अर्थ काय? पक्षात फूट कधी येते, जेव्हा पक्षातच एक मोठा वर्ग वेगळा झाला देशपातळीवर, अशी स्थिती इकडे नाही. काही लोकांनी पक्ष सोडला काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली आणि तो लोकशाहीमध्ये त्यांचा अधिकार आहे. जो त्यांनी निर्णय घेतला म्हणून लगेच फूट म्हणायचे काही कारण नाही तो त्यांचा निर्णय आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यानंतर आता यासंदर्भात महाविकास आघाडीसह अन्य नेते यावर भाष्य करताना पाहायला मिळत आहे.
काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यासंदर्भात भाष्य करताना वेगळाच दावा केला आहे. असे वक्तव्य करुन शरद पवार अजितदादांना त्यांच्यासोबत घेतील. शरद पवार मोठे नेते आहेत. अजित पवार यांची पुन्हा घरवापसी होईल. अशा वक्तव्यामुळे राष्ट्रवादीत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. तो संभ्रम शरद पवार यांनी दूर करावा, असे मत नाना पटोले यांनी व्यक्त केले आहे.
कोण कुठे जातो हे आता निवडणुकीतच कळणार
कोण कुठे जातो हे आता निवडणुकीतच कळणार आहे. जनता उघड्या डोळ्यांनी हे सर्व पाहते आहे. पैशाच्या भरवशावर लोकांना विकत घेऊ असे वाटत असेल, पण जनता यांना खड्ड्यात घातल्याशिवाय राहणार नाही. येणाऱ्या काळात ते दिसेल, असे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या विधानावरून राजकीय चर्चा सुरु झाली आहे. शरद पवार यांच्या विधानाचा सरळसरळ अर्थ असा लावला जाऊ शकतो की महाराष्ट्राला व देशाला अजित पवार रिर्टन्स पार्ट-२ पहायला मिळू शकतो, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटले आहे.