“सर्व समाजाचे प्रश्न मार्गी लागतील, जातीनिहाय जनगणना करा”; काँग्रेसची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2023 07:12 PM2023-09-27T19:12:41+5:302023-09-27T19:13:03+5:30
Maharashtra Politics: भाजप कोणत्याच समाजाला काहीच देणार नाही ते फक्त आश्वासने देतात, अशी टीका नाना पटोले यांनी केली.
Maharashtra Politics: भारतीय जनता पक्षाने २०१४ पासून समाजात तेढ निर्माण करणारे विषारी बिज पेरले आहे, त्याचा आता काटेरी वृक्ष झाला आहे. भाजप कोणत्याच समाजाला काहीच देणार नाही ते फक्त आश्वासने देतात. जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी काँग्रेस पक्ष, सोनिया गांधी व राहुल गांधी यांनी केली आहे. मोदी सरकारने जातनिहाय जनगणना केली तर सर्व समाजाचे प्रश्न सुटण्यास मदत होईल पण भाजप जातनिहाय जनगणना करणार नाही. महागाई, बेरोजगारी या जनतेच्या मुळ प्रश्नावर मोदी सरकारकडे उत्तर नाही म्हणून ते समाजात तेढ निर्माण करुन मुख्य विषयांपासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत असतात, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रप्रेम, हिंदुत्व, हे बेगडी आहे. भाजप कोणाचाच नाही तो फक्त सत्तेचे भुकेला आहे, सत्तेसाठी ते काहीही करु शकतात. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अहमदनगर शहरातील दौऱ्यात भारत मातेच्या घोषणा दिली जात असताना या घोषणा थांबवून बावनकुळे यांनी नरेंद्र मोदींच्या घोषणा द्यायला लावल्या. भाजपला भारतमाता, प्रभू श्रीरामांपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठे वाटतात, अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे.
भाजपचे सरकार हे शेतकरी विरोधी
कांद्याप्रश्नी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, भाजपचे सरकार हे शेतकरी विरोधी आहे. कांद्याला बाजारात चांगला भाव मिळत असताना त्याचा निर्यात कर ४० टक्के वाढवून भाव पाडले व शेतकऱ्याला मिळणारे पैसे हिरावून घेतले. टोमॅटोला चांगला भाव मिळत होता पण पुन्हा बाजारात भाव पाडले. शेतकऱ्याचा माल बाजारात येताच भाव पाडून शेतकऱ्याचे पैसे मिळणार नाहीत याची व्यवस्था केली जाते. एकीकडे शेतमालाला भाव मिळत नाही तर दुसरीकडे शेती साहित्यावर जीएसटी लावला जातो, खते, बियाणे, डिझेलचे दर वाढवले जात आहेत. भाजप सरकारला शेतकऱ्यांचे काहीही देणेघेणे नाही, अशी टीका नाना पटोले यांनी केली.