“मराठा समाजाला दिलेले आरक्षणाचे आश्वासन भाजपने पूर्ण करावे”; नाना पटोले स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2023 04:00 PM2023-10-12T16:00:55+5:302023-10-12T16:02:22+5:30
Congress Nana Patole News: राज्यात व केंद्रातही भाजपचे सरकार आले असताना आरक्षणासाठी मराठा समाजाला मोर्चे का काढावे लागत आहेत, असा सवाल नाना पटोलेंनी केला.
Congress Nana Patole News: राज्यातील भाजपप्रणित शिंदे सरकारने तरुणांच्या सरकारी नोकरीच्या स्वप्नावर पाणी फेरले असून कंत्राटी पद्धतीने पोलीस भरती सुरु करुन आरक्षणवरही घाव घातला आहे. सरकारचा हा निर्णय अत्यंत घातक व सुरक्षेच्यादृष्टीने गंभीर आहे. राज्यातील भाजपाप्रणित सरकार गुजरातच्या आऊट सोर्सिंगवर चालत आहे पण पोलीस भरती कंत्राटी पद्धतीने करुन तरुणांसोबतच महाराष्ट्राच्या सुरक्षेचा खेळखंडोबा करु नका, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे.
नाना पटोले यांनी भाजप सरकारचा खरपूस समाचार घेतला. मुंबई पोलीस दलात तीन हजार पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याचा जीआर सरकारने काढला आहे. पोलीस दलासारख्या सुरक्षेसाठी महत्वाच्या असलेल्या खात्यात कंत्राटी पद्धतीने भरती करणे हे अत्यंत चुकीचे आहे. पोलीस दल, तहसीलदार अशी महत्वाचे पदे ओऊटसोर्सिंगने भरून सरकार चुकीचा पायंडा पाडत आहे. सुरक्षेच्या दृष्टीने महाराष्ट्राचा देशात नावलौकिक आहे, कंत्राटी पोलीस भरती करुन भाजपा सरकार महाराष्ट्राच्या सुरक्षेचे तीन तेरा वाजवत आहे. कंत्राटी पद्धतीने पोलीस भरती करून राज्यातील येड्याचे सरकार महाराष्ट्राला काळिमा फासण्याचे काम करत आहे, हे काँग्रेस कदापी खपवून घेणार नाही, असा इशारा नाना पटोले यांनी दिला.
मराठा समाजाला मोर्चे का काढावे लागत आहेत?
भाजपाने निवडणुका जिंकण्यासाठी जी काटेरी बीजे पेरली होती ती आता बाहेर निघत आहेत. भारतीय जनता पक्षाने २०१४ साली मराठा समाजाला १६ टक्के देतो असे आश्वासन दिले होते. सत्ता आल्यानंतर आरक्षण देणार असे छातीठोकपणे सांगत होते. २०१४ नंतर राज्यात व केंद्रातही भाजपचे सरकार आले असताना आरक्षणासाठी मराठा समाजाला मोर्चे का काढावे लागत आहेत? मराठा समाजाला जर आज आरक्षणासाठी मोर्चे काढावे लागत असतील तर त्याचे पाप भाजपाचेच आहे. सरकार अकार्यक्षम आहे कोणत्याही समाजघटकांना न्याय देऊ शकत नाही म्हणून विविध समाजघटक मोर्चे काढून न्यायाची मागणी करत आहेत, असे सांगत नाना पटोले यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली.
दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली आज नागपूर येथे नागपूर विभागाची आढावा बैठक घेण्यात आली. विदर्भात काँग्रेस पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यावर भर देणे तसेच उदयपूर शिबिरातील निर्णयांची अंमलबजावणीबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. आगामी निवडणुकीत काँग्रेस पक्षाला जास्तीत जास्त जागांवर विजय मिळावा यासाठी संघटना मजबूत करण्यावर भर दिला जात आहे.