“राहुल गांधी देशाचे पंतप्रधान झाले तर भ्रष्ट भाजप नेत्यांना तुरुंगात टाकू”; काँग्रेसचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2023 09:26 AM2023-06-22T09:26:40+5:302023-06-22T09:27:02+5:30
भाजपला त्यांची योग्य जागा दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असा निर्धार व्यक्त करण्यात आला.
Nana Patole News: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. भाजपविरोधी पक्षांची एक महत्त्वाची बैठक पाटणा येथे होणार आहे. देशभरातील विरोधी पक्षांचे नेते या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जात आहे. भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधकांनी कंबर कसली असली तरी भाजपने विरोधकांवर मात करण्यासाठी मोठ्या प्रमाणात काम सुरू केल्याचे सांगितले जात आहे. अशातच आता राहुल गांधी देशाचे पंतप्रधान झाले तर भ्रष्ट भाजप नेत्यांना तुरुंगात टाकू, असा इशारा देण्यात आला आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यासंदर्भात भाष्य केले आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे देशाचे पंतप्रधान झाले तर भ्रष्ट भाजप नेत्यांना तुरुंगात टाकू, असा इशारा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला. जशा निवडणुका जवळ येतील तसे विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जाईल. हे आम्हाला नवीन नाही. ही संभाव्य भीती आम्हा सगळ्यांच्या लक्षात आली असून भाजपला आम्ही योग्य उत्तर देऊ, असेही पटोले यांनी ठणकावून सांगितले.
भाजपला त्यांची योग्य जागा दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नाही
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पटोले यांनी भाजपवर टीकेची झोड उठवली. या देशातील भ्रष्टाचार मुक्त करायचा असेल तर एक सोपे काम नरेंद्र मोदी यांच्या सरकारने करून ठेवले आहे. जे काही भ्रष्टाचारी लोक आहेत त्या सर्वांना ईडी व सीबीआयचा धाक दाखवून भाजपमध्ये एकत्र आणले आहे. त्यामुळे राहुल गांधी पंतप्रधान झाले तर या सगळ्यांना तुरुंगात टाकायला सोपे जाईल. काँग्रेससह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट व राष्ट्रवादी यांची महाविकास आघाडी भक्कम असून भाजपला त्यांची योग्य जागा दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असेही प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, आदिवासी आश्रम शाळेतील वर्ग ३ व ४ च्या रोजंदारी व तासिका तत्वावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचे सरकारी पत्रक अन्यायकारी आहे. हे कर्माचारी अत्यंत अल्प मानधनावर दुर्गम भागात काम करत आहेत. शासनाने याचा सहानुभीपूर्वक विचार करुन कामावरून काढून टाकण्याचे शासन पत्रक रद्द करावे, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.