“हायकोर्टाचे निर्देश पाळावे, सरकारने तातडीने दुष्काळ जाहीर करावा”; नाना पटोलेंची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2023 08:24 PM2023-10-10T20:24:19+5:302023-10-10T20:25:03+5:30

Congress Nana Patole: सोनिया गांधी व राहुल गांधी यांचा भाजप सरकारने केलेला अपमान काँग्रेस कार्यकर्ता कदापी विसरणार नाही, अशी टीका नाना पटोलेंनी केली.

congress nana patole said state govt should declare drought in marathwada | “हायकोर्टाचे निर्देश पाळावे, सरकारने तातडीने दुष्काळ जाहीर करावा”; नाना पटोलेंची मागणी

“हायकोर्टाचे निर्देश पाळावे, सरकारने तातडीने दुष्काळ जाहीर करावा”; नाना पटोलेंची मागणी

Congress Nana Patole: राज्यातील अनेक भागात शेतीची अत्यंत वाईट अवस्था झालेली आहे. कमी पाऊस पडल्याने मराठवाड्यात दुष्काळाची स्थिती आहे. मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये चारपट वाढ झाली आहे. जायकवाडी धरणात केवळ ४० टक्के पाणीसाठा आहे, धरणाच्या वरच्या भागातील धरणातून जायकवाडीत पाणी सोडण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत त्याचे सरकारने पालन करावे तसेच मराठवाड्यातील परिस्थिती पाहता राज्य सरकारने तातडीने दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची मराठवाडा विभागाची आढावा छत्रपती संभाजीनगर येथे पार पडली. यावेळी छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर नांदेड, हिंगोली, परभणी धाराशिव, बीड या जिल्ह्यांचा आढावा घेण्यात आला. प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, सात तारखेपासून विभागानिहाय आढावा बैठका सुरु आहेत. आज मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांचा आढावा घेण्यात आला. उदयपूर शिबिरातील बैठकीत घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी झालेली आहे की नाही त्याचा आढावा घेतला जात आहे. संघटनात्मक बांधणी मजबूत करून प्रत्येक घटकापर्यंत काँग्रेस विचार पोहचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, असे नाना पटोले यांनी सांगितले.

जातनिहाय जनगणना करण्याची भूमिका

काँग्रेस पक्षाने जातनिहाय जनगणना करण्याची भूमिका घेतलेली आहे. उदयपूर शिबिरातही काँग्रेसने यासंदर्भात निर्णय घेतला होता. आरक्षणाच्या प्रश्नावरून दोन समाजात वाद होताना दिसत आहेत. २०१४ मध्ये भाजपाने मराठा, धनगर, गोवारी, ठाकूर समाजाच्या लोकांना आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते पण देशात व राज्यात भाजपाचे सरकार आले पण त्यांनी आरक्षण त्यांनी दिले नाही. २०२१ साली जनगणना होणे अपेक्षित होते पण ती आजपर्यंत झालेली नाही, भाजप मुद्दाम जनगणना करत नाही. संभाजी नगरमधील घाटी रुग्णालय, नांदेड, नागपूर येथील शासकीय रुग्णालयात औषधे मिळाली नाहीत म्हणून लोकांचे मृत्यू झाले. उच्च न्यायालयानेही सरकारवर याप्रश्नी कडक तोशेरे ओढले पण भाजपचे आंधळे, बहिरे सरकार त्याकडे लक्ष देत नाही, अशी टीका नाना पटोले यांनी केली. 

दरम्यान, केंद्रातील भाजपाचे सरकार विरोधी पक्षाला वाईट वागणूक देत आहे. दडपशाही व दहशत निर्माण करत आहे. केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग करत आहे. सोनिया गांधी व राहुल गांधी यांनाही भाजप सरकारने चौकशीच्या नावाखाली अत्यंत वाईट वागणूक दिली. सोनिया गांधी आजारी असतानाही भाजपा सरकारने त्यांना ईडीच्या कार्यालयात बोलावून चौकशीच्या नावाखाली त्रास दिला. सोनिया गांधी व राहुल गांधी यांचा भाजप सरकारने केलेला हा अपमान काँग्रेस कार्यकर्ता कदापी विसरणार नाही. 

 

Web Title: congress nana patole said state govt should declare drought in marathwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.