“महाराष्ट्रात अजित पवार यांचे नाही, तर उद्धव ठाकरेंचे सरकार आहे; तेच राज्याचे प्रमुख”
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 10:52 PM2022-02-18T22:52:10+5:302022-02-18T22:53:34+5:30
राज्याचा अर्थमंत्री राष्ट्रवादीचा असल्याने काँग्रेसवर अन्याय होतोय का, असे विचारण्यात आले होते.
रत्नागिरी: गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आणि भाजप यांच्यातील आरोप-प्रत्यारोप वाढत चालले असताना, दुसरीकडे महाविकास आघाडीतील (Maha Vikas Aghadi) बेबनाव चव्हाट्यावर आला आहे. १० मार्चनंतर राज्यात मोठे बदल दिसतील, असे विधान नाना पटोले यांनी केले होते. यानंतर राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यानंतर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची भेट घेतली. यानंतर आता नाना पटोले यांनी केलेल्या एका विधानामुळे पुन्हा एकदा महाविकास आघाडीत वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मीडियाशी संवाद साधताना राज्याचा अर्थमंत्री राष्ट्रवादीचा असल्याने तुमच्यावर अन्याय होतोय का, असा प्रश्न नाना पटोले यांना विचारण्यात आला होता. यावर बोलताना, राज्याचे सरकार हे अजित पवार यांचे नसून उद्धव ठाकरे यांचे आहे. ते राज्याचे प्रमुख आहेत, त्यामुळे आमच्या ज्या मागण्या असतील त्या त्यांच्यासमोर मांडणे आमचे काम आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. रत्नागिरी येथे आयोजित ओबीसींच्या हल्लाबोल आंदोलनानंतर ते बोलत होते.
संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांची चौकशी झाली पाहिजे
भुंकणाऱ्या कुत्र्यांच्या तोंडी आपण लागत नाही, याचा अर्थ मी कुणाला कुत्रा म्हटले असे होत नाही. किरीट सोमय्या यांनी कोर्ले गावात जाऊन पाहणी केली. त्यात यांना मुख्यमंत्र्यांची घर दिसली का, असा खोचक सवालही त्यांनी केला. तसेच संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे, असेही नाना पटोले म्हणाले.
दरम्यान, जरी एका पक्षाचे सरकार असले तरी अनेक प्रश्न निर्माण होतात आणि मुख्यमंत्र्यांना ते सोडवावे लागतात. राज्यात तर तीन पक्षांचे सरकार असताना काही प्रश्न नक्कीच आहेत. ते आम्ही आग्रहाने मांडून सोडवून घेणार आहोत. प्रश्न आहेत, हे मात्र आम्ही मान्य करतो. निधीच्या बाबतीतही प्रामुख्याने प्रश्न असून ते सोडवले जातील, असे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटले होते.