Congress Nana Patole: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज दाखल करणे आणि प्रचाराला सुरुवात झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या निमित्ताने पक्षांकडून शक्तिप्रदर्शन केले जात आहेत. मेळावे घेत कार्यकर्त्यांना संबोधित केले जात आहे. कार्यकर्त्यांमध्ये नवा जोश निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यातच वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीतील तणाव वाढताना दिसत आहे. ही सर्वांनी एकत्र येऊन लढण्याची वेळ आहे. वंचित बहुजन आघाडीने मतविभाजनाचे पाप करू नये, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.
भंडारा गोंदिया लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या भंडारा येथील प्रचारार्थ जाहीर सभेत ते बोलत होते. भाजपा सत्तेत आले तर २४ तासांत ओबीसी आरक्षण देतो, अशी वल्गना देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. पण आरक्षण काही दिले नाही. भटक्या जाती, आदिवासी यांना संपवण्याचे काम भाजपा करत आहे. राहुल गांधी यांनी न्याय यात्रेत जनतेशी संवाद साधला, यातूनच ५ न्याय २५ गॅरंटी बनवल्या आहेत. काँग्रेस पक्षाने आपल्या जाहिरनाम्यात महिला, तरुण, शेतकरी, कामगार, व हिस्सेदारी असे ५ न्याय दिले आहेत. काँग्रेसचे ५ न्याय व २५ गॅरंटी हे घरोघरी पोहचवण्याचे काम करा, असे आवाहन नाना पटोले यांनी केले.
मतविभाजनाचे पाप करु नका
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ओवेसीच्या एमआयएम व वंचितने मतविभाजन केल्याने भाजपाच्या विजयाचा मार्ग सोपा केला. आजची लढाई सर्वांनी एकत्र येऊन लढण्याची वेळ आहे, मतविभाजनाचे पाप करु नका, असे आवाहन नाना पटोले यांनी वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांना केले.
दरम्यान, काँग्रेसच्या गॅरंटीची चायना माल अशी टिंगल भाजपा करत आहेत. कोरोनाचे संकट पाहून तातडीने उपाय करण्याचा सल्ला राहुल गांधी यांनी दिला होता. त्याची भाजपाने अशीच टिंगळटवाळी केली होती, आताही तेच सुरु आहे, अशी टीका नाना पटोलेंनी केली.