Maharashtra Politics: परतीच्या पावसाने राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हाताशी आलेले पीक उद्ध्वस्त झाल्याने बळीराजा हवालदील झाला आहे. त्यात दिवाळसण असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. याच मुद्द्यावरून विरोधकांकडून शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला जात आहे. यातच आता शिंदे-भाजप सरकार शेतकरीविरोधी असून, दिवाळीनंतर विद्यमान सरकार बरखास्त करण्याची मागणी करण्यात येणार असून, राज्यपालांकडे यासंदर्भात भूमिका मांडली जाणार आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.
प्रसारमाध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, दिवाळीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार बरखास्त करण्याची मागणी केली जाणार आहे. राज्यातील सरकार शेतकरीविरोधी आहे. हे सरकार शेतकऱ्यांच्या आत्महत्येसाठी जबाबदार आहे. आम्ही लवकरच राज्यपालांकडे ही भूमिका मांडणार आहोत. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची जबाबदारी या ईडीच्या भाजपच्या सरकारने घेतली पाहिजे, ही भूमिका घेऊन आम्ही राज्यपालांकडे जाणार आहोत, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली.
मदतीचा एक रुपयादेखील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला नाही
एकनाथ शिंदे आणि फडणवीस सरकारने जाहीर केलेल्या मदतीचा एक रुपयादेखील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला नाही. राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट आहे. दिवाळीपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतातील मालाचे मोठे नुकसान झाले आहे. विदर्भ तसेच मराठवाड्यातील शेतकऱ्यांना जास्त झळ सोसावी लागत आहे. राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर केला नाही तर काँग्रेसतर्फे तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा नाना पटोले यांनी दिला आहे.
दरम्यान, महाविकास आघाडी सरकारने नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना १० हजार रुपयांची रोख मदत आणि नंतर १० हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले होते. शेतकऱ्यांच्या खात्यात पैसा जमा केला होता. विद्यमान सरकारने नियमांचे अडथळे निर्माण करून शेतकऱ्यांना मदत देत नाही. शेतकरी हा सरकारचा प्राधान्यक्रम असला पाहिजे. पण शिंदे-भाजप सरकार शेतकरी विरोधी आहे, असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"