Congress Nana Patole News:इंडिया आघाडीची सत्ता आल्यावर अयोध्येतील श्रीराम मंदिराचे आम्ही शुद्धीकरण करणार आहोत. सनातन धर्मातील शंकराचार्यांचा या विधीला विरोध होता आणि हिंदू धर्मातील जे चारही शंकराचार्य आहेत, त्यांच्या हातून राम मंदिराचे शुद्धीकरण केले जाईल. त्या ठिकाणी राम दरबार स्थापन केला जाईल. श्रीरामांची मूळ मूर्ती नसून, तेथे बालस्वरुपातील रामलला ठेवण्यात आले आहेत. राम मंदिर उभारण्यात नरेंद्र मोदी यांनी अधर्माच्या मार्गाने काम केले आहे. आम्ही हे सुधारून धर्माच्या मार्गाने करू, असे महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.
इंडिया आघाडीची सत्ता आल्यास आम्ही घेतलेले निर्णय व आमच्या योजना काँग्रेस काढून घेणार, अशा आशयाचे विधान पंतप्रधान मोदी यांनी केले होते. यावर नाना पटोले यांनी मीडियाशी बोलताना पलटवार केला. भाजपाची कोणतीही योजना नाही. मोफत अन्नधान्य देणार ही आमची योजना आहे. उलट आम्ही या योजनेत गोरगरिबांना खायचे तेल, साखर, डाळ देऊन योजना वाढवणार आहोत. तसेच बेरोजगार तरुणांच्या हाताला काम देणार आहोत, असे नाना पटोले यांनी सांगितले.
अनेक प्रादेशिक पक्ष भाजपाला वैतागले आहेत
काँग्रेस आणि आमच्या विचारधारेत फारसा फरक नाही. आमच्या दोघांचीही विचारधारा गांधी-नेहरू यावर वाटचाल करत आहे. पुढील २ वर्षात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसशी अधिक जवळीक साधतील किंवा त्यातील काहींना काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा पर्याय त्यांच्या पक्षासाठी चांगला असेल असे वाटू शकते, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यामुळे भविष्यात शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या चर्चेला बळ मिळाले आहे. यावर नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली. अनेक प्रादेशिक पक्ष भाजपाला वैतागले आहेत. त्यामुळे त्यांना काँग्रेस हा पर्याय वाटत आहे. त्यामुळेच शरद पवार यांनी हे भाकीत व्यक्त केले असावे. फक्त त्यांनी काँग्रेस पक्ष श्रेष्ठींचा सन्मान करावा, असे नाना पटोले म्हणाले.