“बॅलेट पेपरवर मतदानासाठी भारत जोडो यात्रेप्रमाणे मोठे जनआंदोलन उभे करु”: नाना पटोले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 16:50 IST2024-12-10T16:49:34+5:302024-12-10T16:50:30+5:30

Congress Nana Patole News: लोकशाही वाचवायच्या लढाईत मारकडवाडी योद्ध्यांच्या पाठीशी काँग्रेस खंबीरपणे उभा असून, गावकऱ्यांवर जबरदस्तीने दाखल केलेले गुन्हे तात्काळ मागे घ्या, अशी मागणी नाना पटोलेंनी केली आहे.

congress nana patole said we will soon organize a mass movement like bharat jodo yatra to vote on ballot paper | “बॅलेट पेपरवर मतदानासाठी भारत जोडो यात्रेप्रमाणे मोठे जनआंदोलन उभे करु”: नाना पटोले

“बॅलेट पेपरवर मतदानासाठी भारत जोडो यात्रेप्रमाणे मोठे जनआंदोलन उभे करु”: नाना पटोले

Congress Nana Patole News: भारताच्या शेजारच्या देशातील लोकशाही संपुष्टात येत असताना भारतात लोकशाही व्यवस्थेला ग्रहण लावण्याचे काम सुरु आहे. लोकशाहीत मतदार हा राजा असतो त्या मतदार राजाच्या मतदानाची चोरी केली जात आहे. ईव्हीएम मशिनबद्दल जनतेच्या मनात शंका आहेत म्हणूनच मारकडवाडीच्या लोकांनी आपले मत कोणाले गेले हे पाहण्यासाठी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय घेऊन देशाला दिशा दाखवली आहे. लोकशाहीत मतांचा अधिकार अबाधित रहावा व बॅलेट पेपरवरच मतदान व्हावे या मागणीसाठी लवकरच भारत जोडो यात्रेप्रमाणे मोठे जनआंदोलन उभे केले जाईल व त्याची सुरुवात मारकडवाडीपासून करु, असा निर्धार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडीला भेट देऊन गावकऱ्यांशी संवाद साधला. मारकडवाडीतील लोकांनी केवळ मॉक पोलिंग घेण्याचा निर्णय घेतला तर सरकार घाबरले व पोलीसांच्या मदतीने हा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला. १४४ कलम लावले, अनेकांवर गुन्हे दाखल केले आहेत. गावकऱ्यांवर दाखल केले गुन्हे तातडीने मागे घ्यावेत यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन नाना पटोले यांनी दिले आहे.

मारकडवाडीच्या लढाईची सर्व माहिती राहुल गांधी यांना दिली

लोकशाही वाचवण्यासाठी मारकडवाडीच्या योद्ध्यांनी सुरु केलेल्या लढाईत काँग्रेस पक्ष गावकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. आता राज्यातील इतर गावांमधूनही ग्रामसभा ठराव करून बॅलेट पेपरवर मदतदान घेण्याची मागणी करत आहेत. मारकडवाडीतून सुरु झालेला हा लढा आता राज्यभर पसरु लागला आहे. सांगली जिल्ह्यातील कोळेवाडी, रायगड जिल्ह्यातील माणगाव यासह राज्यातील अनेक गावांमध्ये आंदोलने उभी रहात आहेत. ही लढाई आता मारकडवाडीची राहिलेली नसून देशव्यापी आंदोलन बनत आहे. मारकडवाडीच्या लढाईची सर्व माहिती लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना दिली असून भारत जोडो यात्रेप्रमाणे लवकरच एक मोठी यात्रा काढण्यावर विचार सुरु आहे, असेही नाना पटोले म्हणाले.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीतील आश्चर्यकारक निकाल पाहून निवडणूक प्रक्रियेवरच शंका निर्माण झाली आहे. निवडणूक आयोगाने मतदानाच्या दिवशी संध्याकाळी ५ वाजता प्रसिद्ध केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार ५८.३३ टक्के मतदान झाले होते, त्याच रात्री ११.३० वाजेपर्यंत ६५.२ टक्के तर दुस-या दिवशी म्हणजे २१ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता ६६.०५ टक्के मतदान झाल्याचे अधिकृतरित्या जाहीर केले आहे. यात ७६ लाख मतदान कसे वाढले, कोणत्या मतदारसंघात संध्याकाळी ५ वाजल्यानंतर मोठ्या रांगा होत्या त्याचे व्हिडिओ चित्रिकरण सादर करा अशी मागणी निवडणूक आयोगाला पत्र पाठवून केली आहे पण अद्याप त्यांच्याकडून उत्तर मिळालेले नाही, अशी टीका नाना पटोले यांनी केली.
 

Web Title: congress nana patole said we will soon organize a mass movement like bharat jodo yatra to vote on ballot paper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.