काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत जाणाऱ्या भारत जोडो यात्रेला सुरुवात केली आहे. १५० दिवसांच्या या भारत जोडो यात्रेचा आज चौथा दिवस आहे. राहुल गांधींनी पत्रकार परिषदेदरम्यान भाजपावर टीकेचा बाण सोडला. तर दुसरीकडे भाजपाने पलटवार करत राहुल गांधींच्या टीशर्टचा एक फोटो शेअर केला आहे. भाजपाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून राहुल गांधींच्या टीशर्टवर निशाणा साधला. भाजपाने ब्रँडसोबत राहुल गांधींचा त्या टीशर्टमधील फोटो आणि टीशर्टचा फोटो शेअर केला आहे.
टीशर्टची किंमत ४१,२५७ रूपये असल्याचा आरोप भाजपाने केला असून यावर जोरदार निशाणा साधत ‘भारत देखो’ असं म्हटलं आहे. यानंतर आता काँग्रेसने देखील जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. राहुल गांधींबद्दल (Rahul Gandhi) भाजपाचे भय संपत नाही..! 'भारत जोडो यात्रे'मुळे भाजपला धडकी भरली आहे असं म्हणत बोचरी टीका केली आहे. काँग्रेसचे नेते नाना पटोले (Congress Nana Patole) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.
"भाजपाचे भय संपत नाही...! राहुल गांधींबद्दल टीशर्टची किंमत वगैरे असे टुकार मुद्दे भाजपला काढावे लागणे यातूनच सिद्ध होतंय की 'भारत जोडो यात्रे'मुळे भाजपाला धडकी भरली आहे राहुल गांधींबद्दल भाजपाचे भय संपत नाही.... आणि आठवण करूनच द्यायची झाली तर आपल्या देशाला एक असे फकीर लाभले आहेत जे 10 लाख रुपयांचा सुट परिधान करतात" असं नाना पटोले यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
काँग्रेसचाही पलटवार
काँग्रेसनेही पलटवार केला आहे. "भारत जोडो यात्रेत मोठ्या प्रमाणात आलेल्या लोकांना पाहून घाबरलात का? मुद्द्याचं बोला. बेरोजगारी आणि महागाईवर बोला. कपड्यांची चर्चा करायची असेल तर मोदींच्या १० लाखांचा सूट आणि १.५ लाखांच्या चष्म्यापर्यंत गोष्ट जाईल. सांगा यावर बोलायचं आहे का?" असं काँग्रेसने म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सूट आणि चष्माही पाहिला आहे. भारत जोडो यात्रेमुळे भाजपमध्ये भीती निर्माण झाली असल्याची टीका काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी केली.