Nana Patole : "शेतकरी आत्महत्याप्रश्नी शिंदे-फडणवीस सरकार गंभीर नाही"; नाना पटोलेंचा घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2022 06:24 PM2022-08-25T18:24:27+5:302022-08-25T18:31:47+5:30
Congress Nana Patole : राज्यातील शिक्षक भरती घोटाळ्याचे मूळ तत्कालीन फडणवीस सरकारच्या काळात आहे. फडणवीस सरकारने TET साठी आणलेली खाजगी यंत्रणाच भ्रष्टाचाराच्या गाळात अडकलेली होती.
मुंबई - राज्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याची मागणी विरोध पक्ष सातत्याने लावून धरत आहे. राज्य सरकारने जाहीर केलेली तुटपुंजी मदतसुद्धा शेतकऱ्यांपर्यंत पोहचलेली नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत परंतु शिंदे-फडणवीस सरकार मात्र शेतकऱ्यांना मदत देण्यासंदर्भात चर्चाही करत नाही, शेतकरी आत्महत्येविषयी हे सरकार गंभीर नाही, असा घणाघाती हल्ला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Congress Nana Patole) यांनी केला आहे.
विधिमंडळ परिसरात प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, आम्ही विधिमंडळात शेतकऱ्यांचे प्रश्न लावून धरले पण शिंदे-फडणवीस सरकार या विषयावर चर्चा करण्यासही तयार नाही. शेतकरी, कामगार, बेरोजगारांसह सामान्य माणसांच्या प्रश्नाकडे त्यांचे लक्ष नाही. राज्यातील ईडी सरकार कोणत्याच प्रश्नावर गंभीर दिसत नाही. विधीमंडळात मंत्र्यांनी दिलेल्या उत्तरांवरून हे सरकार मस्तीत वागत असल्याचे दिसले. शेतकऱ्यांना भक्कम आधार देण्यात हे सरकार टाळाटाळ करत असून शेतकऱ्यांना या सरकारने वाऱ्यावर सोडले आहे. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे, अतिवृष्टीने झालेल्या नुकसान भरपाईपोटी बागायती जमीन व फळबागेसाठी हेक्टरी १.५ लाख रुपये तर जिरायतीसाठी हेक्टरी ७५ हजार रुपये द्यावेत असा ठराव काँग्रेस कार्यकारिणी बैठकीत केला आहे.
शिक्षक भरती घोटाळा ‘व्यापम’सारखाच; चौकशी करून दोषींना शिक्षा द्या
राज्यातील शिक्षक भरती घोटाळ्याचे मूळ तत्कालीन फडणवीस सरकारच्या काळात आहे. फडणवीस सरकारने TET साठी आणलेली खाजगी यंत्रणाच भ्रष्टाचाराच्या गाळात अडकलेली होती. त्यावेळी झालेल्या तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यकांच्या नोकर भरतीत गडबड घोटाला झाला होता. खाजगी कंपनीमार्फत ह नोकरी भरती प्रक्रिया राबवली गेल्याने परीक्षा केंद्रापासून, पास करण्यापर्यंत घोटाळा झाला आहे.
TET च्या माध्यमातून गुणवंत विद्यार्थ्यांची शिक्षक म्हणून भरती व्हावी व दर्जेदार शिक्षण रहावे हा त्यामागच्या हेतू असेल पण ज्यापद्धतीने ही प्रकीया खाजगी यंत्रणेच्या माध्यमातून राबवली त्यात गुणवंत विद्यार्थ्यांवर अन्याय झाल्याचे दिसत आहे. राज्यात २०१४ ते १९ या काळात झालेली नोकरी भरती ही मध्य प्रदेशातील भाजपाच्या शिवराजसिंह चौहान सरकारच्या काळातील ‘व्यापम’ घोटाळ्यासारखीच आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना शिक्षा करावी व गुणवंत विद्यार्थ्यांवार झालेला अन्याय दूर करून न्याय द्यावा, असेही पटोले म्हणाले.