मुंबई: कोरोना लसीच्या पुरवठ्यावरून केंद्र आणि राज्य सरकार आता एकमेकांसमोर ठाकल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मंत्र्यांनी केंद्राला कोरोना लसीचा पुरवठा करण्याविषयी विनंती वजा मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी केली आहे. (nana patole slams union health minister dr harsh vardhan over statement)
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी महाराष्ट्र सरकावर जोरदार निशाणा साधला होता. त्यावर, नाना पटोले यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी केली आहे. गेल्या वर्षभरापासून देशात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू आहे. या स्थितीत राज्य सरकारने सातत्याने केंद्राकडे लस आणि आर्थिक मदत मागितली जात आहे, असे नाना पटोले यांनी सांगितले. ते पत्रकारांशी बोलत होते.
राज्याला एकत्रच ३-४ कोटी डोस उपलब्ध करून केंद्राने प्रश्न निकाली काढावा; रोहित पवारांचा सल्ला
डॉ. हर्षवर्धन यांच्या वक्तव्याचा निषेध
केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने महाराष्ट्रावर आरोप केला त्याचा आम्ही निषेध करतो. त्यांनी महाराष्ट्राचा अपमान केला आहे. त्याबाबत डॉ. हर्षवर्धन यांनी महाराष्ट्राची माफी मागावी, असा आक्रमक पवित्रा नाना पटोले यांनी घेतला. कोरोना आपत्ती निवारणाची जबाबदारी ही केंद्र सरकारची आहे. तरीही केंद्र सरकार महाराष्ट्रातील जनतेच्या जीविताशी खेळत असल्याचा आरोपही नाना पटोले यांनी यावेळी बोलताना केला.
काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयात कोरोना हेल्पलाइन
भाजप प्रत्येक गोष्टीत राजकारण करत असून, राज्यात सध्या रक्ताचा साठाही कमी आहे. आम्ही राज्यभर रक्तदान शिबिरे घेत आहोत. १४ एप्रिलला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आम्ही राज्यभर रक्तदान शिबिरे आयोजित करणार आहोत. कोरोनामुक्त बुथ असे अभियानही हाती घेत आहोत. तसेच प्रत्येक जिल्ह्यात कोरोना वॉर रूम सुरू करत आहोत. काँग्रेसच्या प्रत्येक जिल्हा कार्यालयात कोरोना हेल्पलाइन सुरू करतोय. मदत आणि पुनर्वसन विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग या दोन्ही मंत्र्यांना आम्ही याची जबाबदारी देत आहोत, अशी माहिती पटोले यांनी दिली.
महाराष्ट्रानंतर ओडिशामध्ये आता कोरोना लसींचा तुटवडा; ७०० केंद्र बंद
काय म्हणाले होते हर्षवर्धन
गेल्या काही दिवसांत महाराष्ट्र सरकारच्या काही नेत्यांनी लसींच्या तुटवड्याबाबत आणि अपुऱ्या पुरवठ्यावरुन केलेली वक्तव्य ऐकली. हा कोरोना नियंत्रणात ठेवण्यात राज्य सरकारला आलेले अपशय झाकण्यासाठीचा प्रयत्न आहे. याबाबत जबाबदारीने वागण्यात महाराष्ट्र सरकारला आलेले अपयश अनाकलनीय आहे. अपयश झाकण्यासाठीच लोकांमध्ये भीती निर्माण केली जात आहे. लसींच्या पुरवठ्याविषयी सर्व माहिती घेतली जात आहे. त्यासंदर्भात राज्य सरकारांनाही माहिती दिली जात आहे. त्यामुळे लस तुटवड्याचे आरोप पूर्णपणे निराधार आहेत, असे डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटले आहे.