Nana Patole at Pandharpur, Aashadhi Wari: आषाढी वारीच्या निमित्ताने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पंढरपुरच्या विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले. "राज्यात सुख समृद्धी नांदू दे. महाराष्ट्र बेरोजगारी आणि शेतकरी आत्महत्या मुक्त होऊ दे. राज्यातील सामाजिक सलोखा कायम ठेवण्याची सुबुद्धी सत्ताधा-यांना दे," असे साकडे पटोले यांनी विठ्ठलाला घातले. विठुरायाचे दर्शन घेण्याआधी नाना पटोले यांनी पंढरपूर तालुक्यातील पिराची कुरोली येथे जगतगुरु संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेतले. तसेच बाजीराव विहीर येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात सहभागी झाले. दिंडीत पायी चालताना पटोलेंनी वारक-यांसह पाऊल खेळण्याचा आनंद घेतला.
नाना पटोले यांनी मंगळवेढा येथे श्री संत गजानन महाराज पालखीचे दर्शन घेतले. ज्ञानोबा माउली तुकाराम आणि 'गण गण गणात बोते' च्या गजरात सभोवतालचा संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. परंपरेनुसार नाना पटोले दरवर्षी पालखींचे आगमन झाल्यानंतर सोलापूर जिल्ह्यात जाऊन दर्शन घेतात व वारकऱ्यांबरोबर विठुमाऊलीच्या भक्तीत रमतात. तोच दिनक्रम यावेळीही त्यांनी काटेकोरपणे पाळला.
सोलापूरवरून पंढरपूरकडे जात असताना पंढरपूर तालुक्यातील गादेगाव येथे ग्रामस्थांकडून नाना पटोले यांचे स्वागत करण्यात आले आणि सत्कार करण्यात आला. यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासोबत सोलापुरच्या खासदार प्रणिती शिंदे, सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष नंदकुमार पवार, सोलापूर शहर काँग्रेचे अध्यक्ष चेतन नरुटे, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, विजय हत्तुरे, सुरेश हसापुरे, राहुल पाटील आदी उपस्थित होते.