औरंगाबाद : रिझर्व्ह बँक, निवडणूक आयोग आणि माध्यमांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे नियंत्रण आहे. कोणाला काही बोलू दिले जात नाही. देशात ही एकप्रकारे आणीबाणीची परिस्थिती आहे. दुसरीकडे राज्यात शिवसेना आणि भाजपचा पोरखेळ सुरू आहे, यामुळे कॉंग्रेस- राष्ट्रवादी परवडली अशी म्हणण्याची वेळ आली आहे अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचा गुरुवारी (दि. १९) तापडिया नाट्यमंदिरात मेळावा झाला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मनसेचे अभिजित पानसे, राजू पाटील, संदीप देशपांडे, आदित्य शिरोडकर, अविनाश अभ्यंकर, अनिल शिदोरी, राजेश येरुनकर, भास्कर गाडेकर, शहराध्यक्ष सतनामसिंग गुलाटी, शहर उपाध्यक्ष आशिष सुरडकर, अब्दुल रशीद खान यांची उपस्थिती होती.
यावेळी ठाकरे म्हणाले, देशात सध्या सदृृढ लोकशाही नाही. नोटाबंदीनंतर देशात साडेतीन कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या. केंद्र सरकार विकासकामे दाखवू शकत नाही. राजकीय उद्दिष्ट साध्य करण्यासाठी दंगली घडविल्या जातात. पुढेही हाच धोका आहे.
नोटाबंदीनंतर भाजपकडे पैसानोटाबंदीचा निर्णय घेताना १६ लाख कोटी रुपये काळा पैसा असल्याचे सांगत होते. प्रत्यक्षात आता नव्या नोटांचे १८ लाख कोटी रुपये काळा पैसा फिरत असल्याचा अहवाल आहे. नोटाबंदीनंतर भाजपकडे जेवढे पैसे आले तेवढे त्यापूर्वी नव्हते. त्यांच्या हातात रिझर्व्ह बँकच आहे. निवडणुकीत काळा पैसा बाहेर येत आहे, असा आरोप त्यांनी केला.
काँग्रेस- राष्ट्रवादी परवडलीराज ठाकरे म्हणाले, मोदी एक वेळ परवडतील; परंतु मोदीभक्त नको. हे खोटं बोलणारं सरकार असून, राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस परवडेल, असे म्हणण्याची वेळ येत आहे.
पंतप्रधान झाल्यास मोदी बदलले पंतप्रधान नरेंद्र मोदींना पर्याय कोण, असे विचारले जाते. परंतु यापूर्वी कधीही पर्याय शोधले जात नसे. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले पाहिजे, हे मीच म्हटले. परंतु पंतप्रधान झाल्यानंतर त्यांची भूमिका बदलली. त्यामुळे माझी भूमिकाही आता बदलली आहे.
'लोकमत'चे केले कौतुक सध्या देशात कोणाला काही बोलू दिले जात नाही. ही एकप्रकारची आणीबाणीच आहे. यावर माध्यमेही बोटचेपी भूमिका घेतात मात्र सरकार विरोधी आवाज उठविण्यात काही माध्यमे अपवाद आहेत असा उल्लेख करत राज ठाकरे यांनी 'लोकमत'सह एका वृत्तवाहिनी व दोन वृत्तपत्रांच्या नावाचा उल्लेख केला.